लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्वच ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्ध राहत नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यामुळे सार्वजनिक आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. यावर उपाय म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाने १ नोव्हेंबर २0१७ पासून उपलब्ध करून दिलेली १0४ या टोल फ्री क्रमांकाची सेवा रुग्णांसाठी आधार ठरत आहे. ग्रामीण व शहरी भागामध्ये आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. प्राथमिक उपचारासाठीही रुग्णालयामध्ये तिष्टत बसावे लागते. शवविच्छेदन डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे वेळेवर होत नाही. जेव्हा रुग्ण प्राथमिक आरोग्य, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात जातात, तेव्हा डॉक्टर तेथे उपस्थित नसतात. म्हणून रुग्णांना मोफत आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागते. डॉक्टरांनी रुग्णालयात थांबलेच पाहिजे, यासाठी शासनाने अनेक उपाय करून पाहिले; मात्र डॉक्टरांनी पळवाटा शोधण्याचे काम केले. दैनंदिन हजेरी असो की बायोमेट्रिक पद्धत, या फेल ठरल्याने कामचुकार डॉक्टरांचे फावत आहे. यासाठी राज्याच्या आरोग्य खात्याने दांडीबहाद्दर डॉक्टरांवर ‘वॉच’ राहावा, यासाठी १ नोव्हेंबरपासून १0४ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. या क्रमांकावर संपर्क साधून रुग्ण आपली तक्रार नोंदवू शकतात.
पुण्यातून होते ‘कंट्रोल’शवविच्छेदन तत्काळ करायचे आहे, रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलेले आहात, काहीतरी इर्मजन्सी आहे, महिलांची प्रसूती आहे, बाळ आजारी आहे आणि प्राथमिक किंवा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उ पस्थित नाहीत, आरोग्याची सुविधा नाही, अशावेळी रुग्णाने किंवा रुग्णाच्या नातेवाइकाने फक्त १0४ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा आणि आपली तक्रार नोंदवायची. हा कॉल पुण्यामध्ये उभारलेल्या कंट्रोल रूमला जाईल. तेथे २५ कर्मचारी चोवीस तास नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याजवळ राज्यातील सर्व ग्रामीण आणि प्राथमिक रुग्णालया तील डॉक्टरांचे नाव आणि संपर्क क्रमांक आहेत. अवघ्या काही सेकंदांत संबंधित रुग्णालयामध्ये कोणाची ड्युटी आहे आणि ते सध्या कोठे आहेत, याची माहिती घेतली जाईल व संबंधित डॉक्टरांना तातडीने रुग्णालयात धाडले जाईल. संबंधित रुग्णालयामध्ये डॉक्टर उपस्थित नसतील, तर रुग्णाला कोणत्या ठिकाणी सेवा उपलब्ध आहे, त्याची माहिती दिली जाईल. प्रत्येक घडामोडीची माहिती संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनाही दिली जाईल.
एखाद्या आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसतील, तर रुग्णांनी १0४ क्रमांक डायल करावा. कंट्रोल रूममधून त्यांच्या समस्येचे नक्कीच निराकरण होईल. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरचे गैरहजेरीचे कारण योग्य नसेल, तर त्यावर कारवाई करण्यात येईल. - डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला.