राम देशपांडे अकोला, दि. १६- पुणे-हाटिया एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या महिलेची प्रसूती झाल्याची घटना बुधवारी मध्य रेल्वे मार्गावरील मलकापूर रेल्वेस्थानकाजवळ घडली. स्टॉपेजेस कमी असल्याने भुसावळनंतर थेट अकोल्यात थांबलेल्या या गाडीतील बाळ-बाळांतिणीला द.म. रेल्वेच्या आरोग्य सेवकांनी तत्काळ अकोला स्त्री रुग्णालयात हलविले.धावत्या रेल्वेत प्रसूत झालेली नीता मदनलाल कुलमित्र ही महिला तिच्या पतीसह २२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेने छत्तीसगढ-मुंगेली या मूळ गावी जात होती. नऊ महिने पूर्ण भरत आलेले असताना प्रवास करणार्या नीताला मलकापूर रेल्वेस्थानकाजवळ कळा सुरू झाल्या. तत्काळ तिची प्रसूती झाली. माहिती मिळताच अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने १0८ क्रमांकावर पूर्वसूचना देऊन ही गाडी शेगावस्थानकावर थांबविणे अपेक्षित होते; मात्र भुसावळनंतर थेट अकोल्याला थांबा असल्यामुळे रेल्वे प्रशासनाला सदर निर्णय घेता आला नाही. अखेर रात्री १0 वाजता अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर बाळ-बाळंतिणीला अकोला स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच दक्षिण मध्य रेल्वेच्या आरोग्य सेवकांनी रेल्वेस्थानकावर धाव घेतली. यामध्ये आरोग्यसेविका ममता कांबळे, रमाबाई, तुषार काळेकर, जय नारायण व डॉ. जगदीश खंदेतोड यांनी परिस्थिती हाताळून तिला स्त्री रुग्णालयात हलविले. रेल्वे प्रवासादरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे एखाद्या रेल्वे प्रवाशाचा जीव अक्षरश: टांगणीला लागतो. अशा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत जवळ येत असलेल्या रेल्वेस्थानकावर थांबा नसतानासुद्धा गाडी थांबविण्याचा अधिकार रेल्वे चालकास द्यायला हवा. अशा प्रसंगी १0८ वर पूर्वसूचना देऊन रुग्णवाहिकेच्या साहाय्याने अत्यावस्थेतील रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचविले जाऊ शकते. अशा प्रसंगी प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने असे काही महत्त्वपूर्ण बदल करणे गरजेचे असल्याचे मत ह्यलोकमतह्णला माहिती देताना रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी व्यक्त केले.
पुणे-हाटिया एक्स्प्रेसमध्ये झाली महिलेची प्रसूती!
By admin | Published: February 17, 2017 2:45 AM