अकोला : जिल्ह्यातील इयत्ता ६ ते ८ साठी विषय शिक्षक पदावर नियुक्त्या न झाल्यामुळे येत्या बदली प्रक्रियेत शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तातडीने निकाली काढाव्या, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, कार्याध्यक्ष श्याम कुलट यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.परिषदेने दिलेल्या निवेदनात निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील वर्ग ६ ते ८ या संवर्गात पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या अद्यापही न झाल्याने त्या जागेवर वर्ग १ ते ५ मधील उपशिक्षक सध्या कार्यरत आहेत. ते शिक्षक बदली प्रक्रियेत अंडर ग्रॅज्युएट टीचर १ ते ५ या संवर्गात अर्ज करीत आहेत. त्यांचे मूळ पद याच वर्गासाठी असल्याने त्यांचे मॅपिंगही त्याच संवर्गात झाले आहे. या कारणास्तव या संवर्गात शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात इयत्ता ६ ते ८ साठी पदवीधर शिक्षकांच्या विषयनिहाय नियुक्त्या केल्यास ती पदे रिक्त राहणार नाहीत. तसे न झाल्यास शिक्षकांवर अन्याय होणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये विषय शिक्षकांच्या नियुक्त्या दोन ते तीन वर्षांपूर्वीच झाल्या आहेत; मात्र अकोला जिल्ह्यात तसे झाले नाही. आता इयत्ता १ ते ५ च्या शिक्षकांचा काहीही दोष नसताना त्यांना परिणाम भोगावे लागणार आहेत. इयत्ता ६ ते ८ या पदावर तातडीने नियुक्त्या करून शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी परिषदेच्यावतीने निवेदनात करण्यात आली. यावेळी सचिन काठोळे, नितीन बंडावार, मुरलीधर कुलट, अरुण वाघमारे, सुनील माणिकराव, विजय वाकोडे, गजानन लोणकर, मो. वसिमोद्दीन, चंद्रशेखर पेठे, देवेंद्र वाकचवरे, संतोष वाघमारे, अंजली मानकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.