संतोष येलकर /अकोलापाणीपुरवठा करण्याइतपत जलसाठा उपलब्ध असला तरी देखभाल-दुरुस्ती कामांच्या अभावात जिल्ह्यातील प्रादेशिक आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांतर्गत गावांचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने, पाणीटंचाईच्या परिस्थितीत आणखीच भर पडली आहे.जिल्ह्यात सध्या सात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत २३0 गावांना पाणी पुरवले जाते. त्यामध्ये ८४ खेडी व लंघापूर या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत, तर खांबोरा, गोपालखेड,कारंजा रमजानपूर,लोहारा व वझेगाव या पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजनेशी संलग्न आहेत. ४९४ गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांमार्फत पाणी दिले जात आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील विविध भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असला तरी पाणीपुरवठा करण्याएवढा जलसाठा सध्या उपलब्ध आहे; मात्र जलवाहिन्यांची तुटफूट, जलवाहिन्यांना गळती, वीज देयकाचा विलंबाने होणारा भरणा, विजेचा कमी-जास्त दाब, लोखंडी जलवाहिन्यांऐवजी पीव्हीसी जलवाहिन्याचा वापर, नादुरुस्त विद्युत पंप व इतर प्रकारच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांचा अभाव असल्याने, जिल्ह्यातील सात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि ४९८ स्वतंत्र पाणीपुरवठय्योजनांतर्गत गावांचा पाणीपुरवठा अनेकदा विस्कळीत होतो. त्यामुळे पाणीटंचाईच्या परिस्थितीत आणखीच भर पडत असल्याचा अनुभव ग्रामस्थांना येत आहे.
देखभाल-दुरुस्तीअभावी पाणीटंचाईत भर
By admin | Published: December 05, 2014 1:32 AM