अकोला : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ४१.६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अद्यापही सर्वदूर पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा विदर्भात मान्सून वेळेवर दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. दमदार पाऊस बरसणार व पिकेही चांगली होणार असल्याची प्रत्येकाला अपेक्षा होती, परंतु सुरुवातीचे काही दिवस बरसल्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांमध्ये ४१.६ टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, जून महिना संपत आला आहे, तरी पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे तीन जिल्ह्यांमध्ये पेरण्या रखडल्या आहे. यामध्ये अकोला केवळ १०.५, बुलडाणा ३१.२ व अमरावती जिल्ह्यात २४.७ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहे. शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय सोयाबीन पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या जागृतीच्या परिणामीही सोयाबीन लागवड झाली नाही.
कपाशीचा पेरा ५० टक्के
वऱ्हाडातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीची पेरणी ५१.२ टक्के क्षेत्रात आटोपली आहे, परंतु यावेळी पावसाने हुलकावणी दिल्याने अद्याप अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांच्या आत पेरणी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्याने कपाशी लागवडीत आघाडी घेतली आहे.
अमरावती विभागातील पेरणी
सरासरी क्षेत्र
३२,२८,५८१ हेक्टर
पेरणी क्षेत्र
१३,४३,५८० हेक्टर
वाशिम, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पेरणी
पावसाअभावी अमरावती विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये पेरण्या रखडल्या आहेत, परंतु वाशिम व यवतमाळ जिल्ह्यामध्ये बहुतांश क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. यामध्ये वाशिम ७८.५ तर यवतमाळ जिल्ह्यात ६२.७ टक्के क्षेत्रात पेरणी झाली.
जमिनीत ओलावा नसल्याने बियाणे खराब होण्याची शक्यता
मागील काही दिवसांपासून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी पावसाचा थेंबही पडत नाही. येथील जमिनीत आवश्यक प्रमाणात ओलावा नसल्याने पेरणी केलेले सोयाबीन, कापूस व तुरीचे बियाणे खराब होण्याची शक्यता आहे.
यंदा पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर पेरणी केली, परंतु अपेक्षित पाऊस अद्यापही झाला नाही. त्यामुळे पिके कोमेजत आहेत.
- संतोष टाले, शेतकरी, माझोड
मृग नक्षत्राने केली निराशा; ‘आद्रा’कडून आशा
मृग नक्षत्रामध्ये दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतित आहे. पिकेही कोमेजून जात आहेत. मात्र, २२ जूनपासून आद्रा नक्षत्र सुरू झाले असून, या नक्षत्रात तरी पाऊस बरसणार, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.