अकोला : यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला; पण अचानक दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, धान पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. मुरमाड जमिनीतील पिके आताच कोमेजली असून, सर्वच खरीप पिकांवर दुष्परिणाम होत आहे. विदर्भातील १५ लाख हेक्टरच्यावर सोयाबीन, धान पिकांना येत्या आठवड्यात पाणी न मिळाल्यास ही पिके हातची जाण्याचा धोका आहे.विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी ९० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत; पण नागपूर विभाग पीछाडीवर आहे. या विभागात ७१ टक्केच पेरण्या झाल्या होत्या. या विभागात सर्वात जास्त सहा लाखांवर धानाचे क्षेत्र आहे; पण पावसाने दीर्घ दडी मारल्याने भाताची (धान) चिखलणी व रोवणी रखडली आहे. एवढ्यात पाऊस न आल्यास धानाचे २५ ते ३० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आताच वर्तविण्यात येत आहे. अमरावती विभागात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक १४ लाख हेक्टरवर झाली आहे; पण पावसाने दडी मारल्याने मुरमाड जमिनीतील सोयाबीन पिकाने मान टाकली असून, बहुतांश भागात हे पीक करपले आहे. पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यातील कापूस पीकही करपले आहे. अनेक शेतकऱ्यांना कापसावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. सध्या भारी, काळ्या जमिनीतील कापूस पीक तग धरू न आहे. या जमिनीतील तूर पीकही उत्तम आहे; पण पावसाची आता नितांत गरज आहे. पाऊस लांबल्यास या पिकांनाही धोका होण्याची शक्यता आहे. पाऊस नंतर दीर्घ खंड पडल्याने किडींना पोषक वातावरण तयार झाले आहे. अगोदरच कपाशीवरील बोंडअळीचे व्यवस्थापन करताना शेतकरी गलितगात्र झाला असताना सोयाबीनवर स्पोडोप्टेरा, चक्रीभुंगा, हिरवी उंटअळी आदी किडींचा उद्रेक वाढला आहे.विदर्भात सात जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस असून, बुलडाणा जिल्ह्यात ३७ टक्के पाऊस कमी आहे. अमरावती १९, नागपूर ११, भंडारा १३, वर्धा १३, यवतमाळ ९, गोंदिया ७, तर वाशिम जिल्ह्यात ५ टक्के पाऊस कमी आहे.
विदर्भात पावसाने दडी मारल्याने बरड जमिनीतील पिके कोमेजली आहेत. एवढ्यात पाऊस न आल्यास ही पिके हातची जाण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील धान व पश्चिम विदर्भातील सोयाबीन पीक सध्या अडचणीत आहे.डॉ. शरदराव निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.