अकोला : राज्यात बुधवारी रात्रीपासून कडक संचारबंदी लावण्यात आली. या कडक निर्बंधांमुळे हातावर पोट असलेल्यांचे हाल होऊ नयेत, याकरिता शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील दररोज तीन हजार जणांना लाभ होणार आहे. गरिबांना कमी पैशात जेवण उपलब्ध व्हावे, याकरिता राज्य सरकारने शिवभोजन थाळीला सुरुवात केली. सुरुवातीला ही थाळी १० रुपयांना मिळत होती. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती व गरिबांच्या उपासमारीची शक्यता लक्षात घेऊन शिवभोजन थाळी हा उपक्रम तालुका पातळीवरही राबवण्यात आला. ही थाळी आता दहा रुपयांऐवजी पाच रुपयांना देण्यात येत आहे. कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. अशात पुन्हा बुधवारी रात्रीपासून राज्यात कडक संचारबंदी लावण्यात आली आहे. यादरम्यान हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होऊ नयेत यासाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यामुळे जिल्ह्यातील १३ केंद्रांवरून तीन हजार थाळ्या मोफत मिळणार आहेत. या निर्णयामुळे कोरोनाच्या संकटकाळात काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रे
१३
दररोज किती जण घेतात लाभ
३,०००
तीन हजार जणांना मिळतो दररोज लाभ
जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळीची १३ केंद्रे आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून दररोज तीन हजार जणांना शिवभोजन थाळीचा लाभ मिळतो.
अकोला शहरात सर्वोपचार रुग्णालय, बाजार समिती व जिल्हा स्त्री रुग्णालय या तीन केंद्रांतून शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येत आहे.
दिवसभर मजुरी करून २०० रुपये कमवितो. घरी जाण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे दररोज खाण्यापिण्याचे हाल होत होते. शिवभोजन केंद्र सुरू झाल्याने मोठा आधार मिळाला.
-विजय बाठे
कोरोनाकाळात केवळ पाच रुपयांमध्ये जेवण मिळत असल्याने शिवभोजन केंद्रावर जेवण करत असतो. आता ही थाळी मोफत देण्याची घोषणा झाली आहे. त्यामुळे या कठीण वेळेत खिशातून पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही.
-ईश्वर धोटे
शेतमाल बाजारात घेऊन वेळोवेळी बाजार समितीत यावे लागते. शिवभोजन थाळीमुळे जेवणाची चिंता राहत नाही. आधी अत्यल्प किमतीमध्ये मिळणारे शिवभोजन आता मोफत मिळणार आहे. याचा चांगला फायदा होईल.
-नाथा तराळे