अकोला: पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, चारा, पाणी टंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने दुग्धोत्पादनावर याचा परिणाम होत असून, वर्हाडातील दुग्धोत्पादनात मोठी घट झाली आहे. अकोल्याच्या शासकीय दूध योजनेत १७ ते १९ हजार लिटर दूध येत होते; ते आजमितीस ११ हजार लिटरवर आले आहे.यावर्षी पावसाने पाठ फिरवली असून, पश्चिम विदर्भातील अनेक भागांमध्ये पाऊस नसल्याने या भागातील गुरांच्या चार्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यात चारा लागवडीवर भर देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात डिसेंबर २0१५ पासून चारा लागवड हाती घेण्यात आली आहे. अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फतही (महाबीज) वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात आला आहे; पण अद्याप चारा हाती आला नसून, दर मात्र प्रचंड वाढले आहेत. पशुधनाला लागणार्या हिरव्या चार्याची गरज भागविण्यासाठी पिंपळ, सुबाभूळ, कडुनिंबाचा चारा विकत घेण्याचीही वेळ शेतकर्यांवर आली आहे.ज्वारी, कापूूस हे या भागात मुख्य पीक होते; परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये या पिकांची जागा सोयाबीनने घेतल्याने विदर्भातील ही पारंपरिक पिके मागे पडली आहेत. ज्वारीचे उत्पादन घटल्याने पशुधनासाठी पोषक व आवश्यक कडबा कमी झाला आहे. परिणामी कडब्याचे दर प्रचंड वाढले असून, एका पेंढीचा दर ५0 रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर या कडब्यापासून तयार होणार्या कुट्टीचा दर ८ ते १२ रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम दुग्धोत्पादनावर होत आहे. अकोल्याच्या शासकीय दूध योजनेत येणार्या दुधाची आवक घटली आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद, बुलडाणा जिल्ह्यात चिखली, वाशिम जिल्हा व अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर, आकोट येथून दररोज येणारी दुधाची आवक आजमितीस जवळपास पाच ते सहा हजार लिटरने घसरली आहे.
व-हाडात दुग्धोत्पादन घटले!
By admin | Published: March 09, 2016 2:00 AM