अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टर, परिचारिकांच्या हलगर्जीमुळे नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत पित्याने शुक्रवारी दुपारी रामदासपेठ पोलीस ठाण्यात मृत्यूस जबाबदार डॉक्टर व प्रशासनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रार दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील कल्पना अरविंद पाचपोर या महिलेला १२ फेब्रुवारी रोजी पहाटे प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयात भरती केले. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान प्रसूती झाल्यानंतर मुलीचा जन्म झाला. दोन दिवस मुलीची प्रकृती उत्तम होती; परंतु नंतर काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. या कक्षामध्ये मुलीची आई दूध पाजण्यासाठी जायची. दरम्यान, गुरुवारी मुलीच्या हाताला लावलेल्या सलाइनची सुई मुलीच्या डोळ्यात गेल्यामुळे तिचा डोळा निकामी झाला. ही बाब मुलीच्या आई व वडिलांना कळाल्यावर त्यांनी ही बाब रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांच्या कानावर घातली. त्यानंतर गुरुवारी रुग्णालय प्रशासनाने मुलीला रुग्णवाहिकेने न पाठविता, पालक व मुलीला आॅटोरिक्षामध्ये बसवून खासगी रुग्णालयात डोळा तपासणीसाठी पाठविले. त्यावेळी खासगी डॉक्टरांनीसुद्धा डोळ्यात जखम झाल्याचे पालक अरविंद पाचपोर यांना सांगितले. त्यानंतर त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. डॉक्टर व परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पाचपोर यांनी केला. त्यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करीत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील.
डॉक्टर व परिचारिकांनी उपचार करण्यात दिरंगाई आणि हलगर्जी केल्यामुळे माझ्या चिमुकल्या मुलीला प्राण गमवावा लागला. जबाबदार डॉक्टर, परिचारिकांवर कठोर कारवाई व्हावी.-अरविंद पाचपोर, पालकलाखनवाडा.
सलाइनची सुई लागून बाळाच्या डोळ्यात जखम होणे शक्य नाही. मुदतीपेक्षा अगोदर बाळाचा जन्म झाला आणि डोळ्याच्या आतच रक्तस्राव झाल्यामुळे खासगी डॉक्टरांनासुद्धा दाखविण्यात आले. बाळाच्या उपचारात कोणतीही हलगर्जी, दुर्लक्ष आम्ही केले नाही. पालकांनी केलेले आरोप निराधार आहेत.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका,जिल्हा स्त्री रुग्णालय.