- गजानन वाघमारे
बार्शीटाकळी : येथील बायपास मार्गावरील स्टेट बँकेचे एटीएम मशिन फोडण्याचा तीन अज्ञात चोरट्यांचा डाव गुरुवारी रात्रपाळीवरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळल्या गेला. बार्शीटाकळी पोलिस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांना पाहताच चोरट्यांनी एटीएम फोडण्याचे साहित्य तेथेच टाकून पळ काढल्याने एटीएममधील ३७ लाख ६५ हजार रुपये बचावले.येथील बायपास मार्गावर स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा असून, बाजूलाच बँकेचे एटीएम केंद्र आहे. पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहायक उपनिरीक्षक यू. डब्ल्यू. वानखडे व शिपाई किशोर पवार हे दोघे गुरुवार, २४ जानेवारी रोजी रात्र पाळीवर कर्तव्यरत होते. मध्यरात्रीनंतर हे दोघे बायपास मार्गावर गस्तीवर गेले असता, त्यांना स्टेट बँकेसमोर तीन अज्ञात इसम दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिस त्यांच्या दिशेने गेले. पोलिस आपल्याकडे येत असल्याचे पाहून अज्ञात इसमांनी एटीएम फोडण्याचे गॅस कटर, सिलींडर व नोझल हे साहित्य जागेवरच सोडून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा रेल्वेलाईनपर्यंत पाठलाग केला; परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर पोलीसांनी चोरट्यांचे एटीएममध्ये पडलेले साहित्य जप्त केले. यावेळी चोरट्यांनी सीसी कॅमेरावर ‘स्प्रे’ फवारून तो निकामी केल्याचे दिसून आले. फिर्यादी राहुल गहुले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुज्ञ भादंवी च्या कलम ३८०, ५११, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
एटीएम मध्ये होते ३७ लाख ६५ हजार रुपयेस्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात दोन मशिन असून, २४ जानेवारी रोजी मशिन क्र. १ मध्ये १९ लाख २०० रुपये, तर मशिन क्र. २ मध्ये १८ लाख ५७ हजार रुपये असे एकून ३७ लाख ६५ हजार २०० रुपये शिल्लक होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे बँकचे ३७ लाख ६५ हजार रुपये बचावले.