लोकमत न्यूज नेटवर्कवडाळी देशमुख : अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख परिसरात ४ जून रोजी वादळी वारा व गारांसह पाऊस झाला. त्यामध्ये मंदिराच्या बांधकामाची भिंत कोसळून एक जण ठार झाल्याची घटना शहापूर बृहत प्रकल्पाजवळ घडली. पावसामुळे गावातील घरात पाणी घुसले, तर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. वडाळी देशमुख येथील विजय वारुळे हे शेतकरी शेतामधून परत येत असताना जोरदार पाऊस सुरू झाला व गारा पडू लागल्या. यावेळी पावसापासून बचाव करण्याकरिता धरणाच्या भिंतीजवळ बांधकाम सुरू असलेल्या मंदिराजवळ थांबले. यावेळी मंदिराची भिंत वार्यामुळे व पावसामुळे कोसळल्याने विजय वारुळे यांचा जागीच मृत्यू झाला.वादळी वार्यामुळे या परिसरातील झाडे पडली, विद्युत तारा तुटल्या, घरावरील टिन हे पंख्यासह उडून गेले. नवीन प्लॉटमधील वस्तीत पाणी घुसल्याने तारांबळ उडाली. शिवाय, परिसरात असलेल्या केळी व कांद्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस व वादळी वारा सुटल्याने तारा तुटल्या, त्यामुळे उशिरा रात्रीपर्यंंत येथील विद्युत पुरवठा खंडित होता. पावसामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी पावसामुळे शेतकर्याचा मृत्यू झाला असून, झालेल्या नुकसानीची माहिती पोलीस पाटील यांनी महसूल व पोलीस प्रशासनाला दिली. शिवाय, अकोट तालुक्यातील काही गावात पाऊस पडला असून, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.या नुकसाना संदर्भात प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करुन मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पावसामुळे मंदिराची भिंत कोसळली: एक ठार
By admin | Published: June 05, 2017 2:08 AM