सिरसोली (अकोला) : परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, गेल्या २५ दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. पाऊस येण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी ग्रामदैवत असलेले श्री गुप्तेश्वर महाराज यांच्या मंदिरामध्ये घट स्थापन करण्यात आला. सिरसोली परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. आधीच गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न होत नसल्याचे चित्र आहे. यावर्षीही पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. परिसरात पावसाअभावी उगवलेली पिकेही सुकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सिरसोलीचे ग्रामदैवत असलेले श्री गुप्तेश्वर महाराज यांच्या मंदिरामध्ये पाण्यासाठी घट बसवण्यात आला. आषाढी एकादशीला व बारसला सकाळी भंडारा झाला. नंतर बारा नक्षत्रांचा गोल घट मांडण्यात आला. या घटामध्ये मधोमध पाण्याचे घंगाळ ठेवण्यात आले, तसेच चौकून गोल रोहिणी नक्षत्रावर अजवान, मृग नक्षत्रावर सोयाबीन, आंदा नक्षत्रावर उडीद, लहान चुकात मूग, पुष्य सरकी, आश्लेशा ज्वारी, मघा नक्षत्रावर बरबटी, पुरभा नक्षत्रावर बाजरी, उतरा नक्षत्रावर तूर, हस्त न क्षत्रावर हरभरा, चित्र नक्षत्रावर तीळ, स्वाती नक्षत्रावर गहू ठेवण्यात आला. गावातून बैलांना सर्व मंदिरातून ढोलाच्या दिंडी भजनांनी दर्शन घेऊन आणले व या घटामध्ये फिरवले. यावेळी गुप्तेश्वर महिला भजन मंडळ व ढोलाचे भजन मंडळ यांनी प्रार्थना केली. (वार्ताहर)
पाण्यासाठी मांडला गुप्तेश्वर महाराजांच्या चरणी घट
By admin | Published: July 06, 2017 2:48 PM