वाशिम: वर्हाडात उन्हाळी पीक म्हणून हळदीचे उत्पादन घेतले जाते; मात्र गत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने या पिकाचे नुकसान झाले असून, शेतकर्यांना फटका बसला आहे. अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या जिल्हय़ांमध्ये कपाशी व सोयाबीन पिकाला फाटा देत, नवनवीन पिकांचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. कपाशीच्या उत्पादनात झालेली घट आणि सोयाबीनचे किडींमुळे होणारे नुकसान, यामुळे शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत आहेत. फळबागांसाठी जास्त पाण्याची गरज असते. सध्या पाणीटंचाई असल्यामुळे पाण्याची कमी गरज असलेल्या हळद पिकाकडे शेतकरी वळले आहेत. ठिबक सिंचन, ड्रीपद्वारे पाणी देऊन कमी पाण्यामध्ये हळदीचे विक्रमी उत्पन्न शेतकरी घेत आहेत. यावर्षी हळदीचे पीक बहरले असतानाच मार्च महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांना नुकसानाचा सामना करावा लागला. त्यानंतर पुन्हा हळदीचे पीक काढणीवर आले असताना, अवकाळी पाऊस झाला. पावसासोबतच काही भागात गारपीटही झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. हजारो शेतकर्यांनी हळद काढून सुकण्यासाठी शेतात ठेवली होती. अशातच सात एप्रिल रोजी रात्री ९ ते १0 वाजताच्या दरम्यान अचानक पाऊस झाला. मालेगावसह काही तालुक्यांमध्ये गारपीटही झाली. त्यामुळे सुकण्यासाठी ठेवलेली हळद ओली झाली. त्यामध्ये मातीही मिसळली गेली. परिणामी शेतकर्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला हळदीचे उत्पादन राज्यातील सांगली, यानंतर मराठवाड्यातील वसमत, नांदेड या जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात घेतले जात होते. गत काही वर्षांपासून हळदीचे उत्पादन वर्हाडातील शेतकरी घ्यायला लागले; मात्र अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाचा हळद पिकाला फटका
By admin | Published: April 10, 2016 1:34 AM