अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई कार्यालयातील तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी पासधारक, सेवानिवृत्त कर्मचारी आणि पत्रकारांना मिळणारे स्मार्ट कार्ड आता उशिराने मिळणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने स्मार्ट कार्डसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मेपर्यंत वाढविली आहे.मध्यंतरी महामंडळाचे मुख्य सर्व्हर बिघडल्याने आॅनलाइन तयार होत असलेल्या स्मार्ट कार्डचे अर्जच अपलोड होत नव्हते. ही समस्या तब्बल तीन दिवस चालली. त्यानंतर मुंबईतील कार्यालयात तांत्रिक बिघाड झाल्याने आता स्मार्ट कार्ड तयार करण्याची प्रक्रियाच थांबली आहे. त्यामुळे राज्यभरातील स्मार्ट कार्ड तयार करण्याची मुदत वाढविली गेली आहे. ३१ मेपर्यंत स्मार्ट कार्डसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे.प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, विविध प्रकारच्या सवलती पासेस, पत्रकार पासेस दिल्या जातात. यंदा प्रथमच ‘एमएसआरटीसी’ने स्मार्ट कार्डच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली; मात्र सुरुवातीपासूनच त्यात अनेक अडचणी समोर येत आहेत. ज्यांनी अजूनही एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी आता ३१ मे २०१९ पर्यंत एसटीच्या विभागीय कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन अकोला विभाग नियंत्रक चेतना खिरवाळकर यांनी केले आहे.