माेठा गाजावाजा करीत सत्ताधारी भाजपसह प्रशासनाने ४५ काेटींच्या घनकचरा प्रकल्पाला सुरुवात केली. तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार सप्टेंबर २०२० मध्ये सहाय्यक आयुक्त वैभव आवारे यांनी मे.परभणी ॲग्राेटेक प्रा.लि. कंपनीला कार्यारंभ आदेश दिला हाेता. वर्कऑर्डर दिल्यानंतर कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणाऱ्या भाेड येथील १९ एकर जागेत भलीमाेठी खदान असल्याचे उघडकीस आले. ही खदान बुजविण्यासाठी प्रशासनाने सात काेटींच्या खर्चाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमाेर मांडला असता हा प्रस्ताव विराेधी पक्ष काॅंग्रेस, शिवसेनेने धुडकावून लावला हाेता. ४ फेब्रुवारी २०२१ राेजी निमा अराेरा यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर जाऊन पाहणी केली हाेती. दरम्यान, १८ फेब्रुवारी राेजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत घनकचऱ्याचा ‘डीपीआर’ सदाेष असल्याचे मान्य करीत निमा अराेरा यांनी ‘मार्स’नामक एजन्सीवर ठपका ठेवत सदाेष ‘डीपीआर’ची पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत चाैकशी करण्याचा निर्णय घेतला हाेता. पुढे त्या चाैकशीचे काय झाले देव जाणेे; परंतु त्यानंतर मे. परभणी ॲग्राेटेक प्रा.लि. कंपनीने घनकचऱ्याच्या वर्गीकरणाला थातूरमातूरपणे सुरुवात केली.
आयुक्तांच्या डाेळ्यांत धूळ फेक
वर्तमानस्थितीत मे.परभणी ॲग्राेटेक प्रा.लि. कंपनीमार्फत डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची छाननी केली जात आहे. अर्थात, वर्गीकरण केलेल्या कचऱ्यातून माती,प्लॅस्टिक, काचेचे तुकडे वेगळे केली जात असतील तर आजवर किती टन कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले, याचा शास्त्रशुद्ध लेखाजाेखा बांधकाम विभागातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांकडे नाही. याप्रकरणी निमा अराेरा यांची दिशाभूल केली जात आहे.
बैठकीत ताेडगा निघेल का?
साेमवारी सकाळपासूनच मनपासमाेर वाहनांच्या लांब रांगा लागल्या हाेत्या. आराेग्य व स्वच्छता विभाग प्रमुख अनिल बिडवे, सेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांनी ताेडगा काढण्याचा प्रयत्न केला. अखेर दुपारी आयुक्त निमा अराेरा यांनी वाहनचालकांची भेट घेऊन मंगळवारी बैठकीत ताेडगा काढण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत ताेडगा निघेल का, याकडे लक्ष लागले आहे.