पातूर (अकोला): अकरावीची परीक्षा देऊन दुचाकीने अकोल्याकडे जात असलेल्या दुचाकीस्वारास टॅँकरने धडक दिल्याची घटना नांदखेडजवळ घडली. या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला, तर दोघे जखमी झाले. सध्या अकरावीची परीक्षा सुरू आहे. बुधवारी पेपर आटोपल्यावर संजय रामकुमार पाल (१९), मनोज लेखराज बघेले, गणेश मोहनलाल यादव (सर्व रा. हरिहरपेठ, अकोला) हे पातूरहून अकोल्याकडे निघाले. यावेळी अकोल्याहून पातूरकडे येत असलेल्या एमएच -१९- झेड- 0३५१ क्रमांकाच्या भरधाव टँकरने नांदखेडजवळील वळणावर मोटारसायकलला धडक दिली. यात संजय पाल हा घटनास्थळीच ठार झाला, तर मनोजकुमार बघेले व गणेश यादव हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार अनिल जुमळे, हेडकॉन्स्टेबल गायकवाड, वाहतूक पोलीस बाळकृष्ण येवले, रायबोले यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना अकोला येथे उपचाराकरिता रवाना केले. पोलिसांनी टॅँकरचालक राजू सहदेव वाकोडे (रा. निंबी) याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
विद्यार्थ्यावर काळाचा घाला, एकाचा मृत्यू
By admin | Published: April 07, 2016 1:56 AM