लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय ‘खासदार चषक’ कबड्डी स्पर्धा ८ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत केळीवेळी येथे होणार आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यंदा आपले ७५ वर्षे पूर्ण करीत असल्याने या हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याची माहिती कबड्डी स्पर्धेचे संयोजक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी दिली.शुक्रवारी, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दाळू गुरुजी यांनी स्पर्धेविषयी सविस्तर माहिती दिली. सवरेदयी नेते रामकृष्ण आढे यांनी १९४२ पासून सुरू केलेले हनुमान मंडळ आज हीरक महोत्सव साजरा करीत आहे. या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शेकडो खेळाडूंनी खेळप्रदर्शन केले. आजपर्यंत मंडळाच्यावतीने १३ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. विविध स्तरातील लोकांनी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे केळीवेळीचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. त्यामुळे केळवेळीत भव्य क्रीडांगण उभारता आले, असेही दाळू गुरुजींनी सांगितले.यंदाच्या स्पर्धेत पंजाब, हरियाणा, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्यातील संघ सहभागी होणार आहेत. तसेच राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यांसह विदर्भातील जवळपास सर्वच जिल्हय़ांतील महिला व पुरुष संघ सहभागी होणार आहेत. खेळाडूंची निवास व्यवस्था पीकेव्हीच्या कृषक भवन येथे करण्यात आली. या स्पर्धेला कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, राज्याध्यक्ष जितू ठाकूर यांच्यासह प्रस्तावाला ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनने मान्यता दिल्याने अखिल भारतीय स्तरावरील सामने हीरक महोत्सवी वर्षात होत असल्याचा आनंद होत असून, यानिमित्त स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार असल्याचे दाळू गुरुजी म्हणाले. पत्रकार परिषदेला आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, कबड्डी संघटनेचे सचिव वासुदेव नेरकर, डॉ. राजकुमार बुले, गणेश पोटे, धनंजय मिश्रा, दिलीप आसरे व दिनकर गावंडे उपस्थित होते.
खासदार धोत्रेंचे स्पर्धेला नावखासदार संजय धोत्रे यांनी केळीवेळी गावाला दत्तक घेतले असल्याने त्यांच्याच नावे ही अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा होत आहे.
आमदारांची भरघोस मदतकेळीवेळी गाव कबड्डीपटूंची पंढरी आहे. केळीवेळी गावाचे राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक व्हावे, तसेच अखिल भारतीय स्तर स्पर्धेचे आयोजन यशस्वी होण्याकरिता आमदार रणधीर सावरकर यांनी स्पर्धेला पाच लाखांचा निधी देणार असल्याचे पत्रकार परिषदेत घोषित केले.