सचिन राऊत / अकोला : निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हय़ातील १ हजार ४४६ मतदान केंद्रावर मतदार याद्या अद्ययावतीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत रविवारी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांनीच (बीएलओ) सुरुंग लावल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले. शहरातील मतदान केंद्रांवर शेकडो बीएलओनी या विशेष मोहिमेला दांडी मारल्याचे ह्यलोकमतह्णच्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत समोर आले असून, बीएलओच्या या गैरहजेरीचा ह्यलोकमतह्णने रविवारी पर्दाफाश केला. मतदारांचा आधार कार्ड क्रमांक मतदार याद्यीशी संलग्नित करणे, मतदार यादीतील मतदाराचे नाव, पत्ता, छायाचित्र या संदर्भातील दुरुस्ती करणे, नवीन नाव नोंदणी करणे, मृतक व दोन वेळा झालेली नावे वगळण्यासाठी मतदार याद्या अद्ययावतीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत रविवारी निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर विशेष मोहीम राबविण्यात आली. मात्र, ज्या अधिकार्यांवर या मोहिमेची जबाबदारी होती, त्या अधिकार्यांनीच दांडी मारल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले. शहरातील बहुतांश मतदान केंद्रावर केलेल्या पाहणीत मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांची गैरहजेरी असल्याचे दिसून आले. यासोबतच काही मतदान केंद्रांना कुलूप असल्याचेही या पाहणीत दिसून आले असून, निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांचेही यावर नियंत्रण नसल्याचे समोर आले. नवीन नाव नोंदणीसाठी व आधार कार्ड क्रमांक संलग्नित करण्यासाठी मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना त्यांचे परिसराचे बीएलओ मतदान केंद्रावर न दिसल्याने कामासाठी आलेल्या हजारो मतदारांना खाली हातच परतावे लागले. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानंतरही अकोला शहरासह जिल्हय़ातील शेकडो बीएलओंनी मतदार याद्या अद्ययावतीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमाच्या विशेष मोहिमेला हरताळ फासल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरण व प्रमाणीकरणासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेला बीएलओंनी दांडी मारल्याने मतदारांना नाहकच मनस्ताप सहन करावा लागला.
विशेष मोहिमेदरम्यान ‘बीएलओ’ची दांडी
By admin | Published: June 29, 2015 2:03 AM