राजेश शेगाेकार
अकाेला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेनेची दबंगशाही अडचणीची ठरत असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याचे प्रकाशित हाेताच रखडलेल्या रस्त्यांवरून आराेपांचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. अकाेलाही त्याला अपवाद नाही. अकाेल्यातील अनेक रस्त्यांच्याबाबतीत असेच आराेप खासगीत केले जातात. या आराेपांना उघड करण्यासाठी गडकरींसारखी हिंमत कंत्राटदार दाखवित नसल्याने सामान्यांचा प्रवास अर्धवट रस्त्यांवरूनच सुरू आहे.
रस्त्यांना विकासाच्या धमण्या संबाेधल्या जातात. या धमण्या जितक्या चांगल्या, तितका विकासाला वेग अधिक, असे मानले जाते. त्यामुळेच शहराकडून महानगराकडे झेपावताना रस्ते विकास अतिशय महत्त्वाचा आहे. सुदैवाने अकाेल्यात सुरुवातही झाली. मात्र कंत्राटदार अन् राजकारण यांचे साटेलाेटे यामध्ये विकासाच्या धमण्यांमध्ये संथगतीचे ‘ब्लाॅकेज’ तयार झाले आहेत. अनेक ठिकाणी अशा ब्लाॅकेजीसमुळे कंत्राटदारही पळून गेले आहेत. हा साराच मामला ताेंड दाबृन बुक्क्यांचा मार असे असल्याने, काेणीच जाहीरपणे तक्रार करत नाही. कंत्राटदारही धुतल्या तांदळाचे नाहीत. त्यामुळे अधिकृत तक्रार करून एखाद्या नेत्याचा चेहरा उघडा करण्याची हिंमत ते दाखवत नाहीत. परिणामी ब्लाॅकेज खुले करण्यासाठी टक्केवारीचे टाॅनिक देऊन काम कसे तरी पूर्ण केले जाते, तर कधी संथगतीमुळे दर वाढवून दिले जातात. या सर्व प्रकारात सामान्यांच्या नशिबातील प्रवास मात्र रस्त्यांवरील धूळ खातच हाेत आहे.
शेगाव गायगाव अकाेला मार्गात कुणाचा दांडा
पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा, अकाेला व वाशिम या तीन जिल्ह्यांत ७०० काेटी रुपयांतून हायब्रीड ॲन्युइटीअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये शेगाव ते अकाेला ते वाशिम या प्रमुख दिंडी मार्गाचा समावेश आहे. काही दिवसांपासून शेगाव ते पारस ते गायगाव तसेच गाेरेगाव ते माझाेड, भरतपूर, वाडेगाव ते पातूर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आता हे काम रखडले आहे. गायगाव मार्गे जाण्यापेक्षा न गेलेले बरे, अशी स्थिती आहे.
अकाेट-अकाेला मार्गावर किती दिवस धूळ खायची?
अकाेला ते बैतुल या मार्गावरील अकाेला ते अकाेट या ४५ कि.मी. रस्त्याचे काम म्हणजे संशाेधनाचा विषय आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये हे काम सुरू झाले, ते ऑगस्ट २०१९ मध्ये पूर्ण हाेणे अपेक्षित हाेते. मात्र ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे कंत्राटदाराला लक्षांकासह मुदतवाढ देण्यात आली. त्या मुदतीतही काम पूर्ण झाले नाही व अखेर कंत्राटदाराला टर्मिनेट करण्याचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आला. हा रस्ता अजूनही अर्धवटच आहे. रस्त्यावरची धूळ अन् खड्डे यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पण याची खंत काेणत्याही लाेकप्रतिनिधीला नाही.
अमरावती, अकाेला, खामगावचा तिढा
अमरावती ते अकोला व खामगाव या २५० कि.मी.च्या मार्गावर वाहन चालवायचे कसे, हा प्रश्नच आहे. ताशी ३० कि.मी. वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन चालूच शकणार नाही, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे या मार्गावर असलेले अंडरपास, पूल किंवा इतर रस्तेकामांमध्ये अनेकांनी हात मारण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारी खासगीत आहेत. त्यामुळे हा महामार्ग सध्या कासवगतीनेच सुरू आहे.
अकाेल्यातील उड्डाण पुलावरून उड्डाण कधी?
अकाेला शहराला महानगराचे रूप देण्यासाठी खुद्द नितीन गडकरी यांच्याच प्रयत्नातून उड्डाण पूल मंजूर झाले. कामाला वेगाने सुरुवातही झाली. पण या विकासाला झारीतील शुक्राचार्यांनी आडकाठी घातल्याने सध्या या पुलांचे काम संथगतीने सुरू आहे. परिणामी जेल चाैक ते अग्रेसेन चाैकापर्यंत अन् लक्झरी बसस्थानकापर्यंतचा रस्ता हा धाेकादायक बनला आहे.