लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुख्य रस्त्यांचे निर्माण कार्य सुरू असल्याने शहरात सर्वत्र धूळ पसरली आहे. अशातच थंडीचा जोरही वाढत असून, हे वातावरण दमा रुग्णांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे दमाच्या रुग्णांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून काही दिवसांपूर्वीच अकोला अव्वल स्थानी पोहोचले. वाहनांच्या धुरासोबतच रस्त्यावरील धुळीच्या कणांमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे.या प्रदूषणाचा अकोलेकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, सर्वाधिक धोका दमा आजारांच्या रुग्णांना होत आहे.हवेतील धुळीच्या कणांमुळे दमा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असून, त्यांच्यासाठी हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. अशातच सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत अकोलेकरांनी प्रतिबंधात्मक उपया योजना कराव्यात, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
थंडीमुळे दम्याच्या रुग्णांना त्रास होतो; पण रस्त्यावरील वाढलेल्या धुळीमुळे हा त्रास जास्त वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यास प्राधान्य द्यावे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.