वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील अकोला मार्गे माझोड-वाडेगाव-गोरेगाव या मुख्य महामार्गाचे काम सुरू असून, या रस्त्यावर होत असलेल्या धुळीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.
या रस्त्याचे गत दोन ते तीन वर्षांपासून काम सुरू असून, या रस्त्यावर होत असलेल्या दबाईच्या कामामुळे व खोदकामामुळे धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, तसेच या रस्त्यावर जवळपास बागायती शेतकरी शेती करीत आहेत. यामध्ये भाजीपाला मेथी, पालक, तूर, रोप आदींसह विविध पिकांवर धुळीचा थर दिसून येतो. सर्वच पिके हिरवे न दिसता पूर्ण पिकाचा रंग भुरकट झाला आहे. या धुळीमुळे शेतकऱ्याच्या शेतातील उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. या पिकाला वाचविण्यासाठी शेतकरी स्प्रिंकलरने पाणी देत आहेत. तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी ‘जैसे थे’ परिस्थिती दिसून येत आहे. पिकाला पाणी द्यायचे किती, या विचारात शेतकरी आहेत, तसेच या रस्त्यावर येणे-जाणे करीत असलेल्या वाहनचालकांना धुळीमुळे वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये डोळे, केस गळती आदींसह विविध आजाराने ग्रासले आहे, तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रस्त्यावर पाणी टाकण्यात यावे, अशी मागणी शेतकरी प्रकाश कंडरकर, दादाराव मानकर, बब्बू डोंगरे, सचिन तिडके, ॲड. सुबोध डोंगरे, सुगत डोंगरे, गौतम डोंगरे, केशवराव सरप तसेच वाहनचालक, विद्यार्थ्यांकडून होत आहे.
----बाॅक्स---
तर पीक वाचविता येईल
या रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून, पिकाचे नुकसान झाले आहे. या रस्त्यावर जर पाणी टाकले तर धूळ होणार नाही. त्यामुळे पीक वाचविता येईल.
महेश मानकर पाटील सामाजिक कार्यकर्ते नकाशी
----काेट---
गत दोन वर्षांपासून वाडेगाव- माझोड- अकोला रस्त्याचे काम संथ गतीने होत आहे. रस्त्यावरील धुळीमुळे अनेकांना आजारांनी ग्रासले आहे, तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपाययोजना कराव्या.
राजेश्वर पळसकार, वाडेगाव.