हातरूण: येथे नव्याने बांधलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे या रस्त्याची साफसफाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हातरूण येथे बसस्थानक-प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली होती. सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने रस्त्यावर खड्डे पडले होते. या दुर्दशा झालेल्या रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानंतर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्यावरून अवजड अथवा चारचाकी वाहन गेल्याने रस्त्यावरील धूळ आजूबाजूने राहणाऱ्या नागरिकांच्या घरात जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
सिमेंट काँक्रिट रस्त्यावरून वाहन जाताच मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धुळीचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. यामुळे हातरूण येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरून उडणारी धूळ वाढली आहे. त्यामुळे बाहेर पडताना तोंडावर मास्क किंवा स्कार्फ आणि डोळ्यांना गॉगल वापरण्यात येत आहे. धुळीचे कण अत्यंत बारीक असल्यामुळे नागरिक खबरदारी घेत आहेत.
रस्त्यावरून जड वाहने जाताच धुळीचे लोट उडतात. समोरचा व्यक्ती किंवा वाहनही दिसत नाही. धुळीमुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याची साफसफाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मुकेश गव्हाणकर, भाजयुमो जिल्हा सचिव यश सेकसरिया, गोपाल सोनोने, अमित काळे, संतोष गव्हाळे यांनी केली आहे. (फोटो)
-------
घरासमोरील सिमेंट काँक्रिट रस्त्यावरून वाहन जाताच धुळीचे लोट उडतात. त्यामुळे मोठा त्रास होत असून, रस्त्याची साफसफाई करण्याची गरज आहे.
- गोपाल सोनोने, ग्रामस्थ, हातरुण.
----------------
प्रवास करताना धुळीचा सामना करावा लागतो. धुळीपासून बचाव होण्यासाठी तोंडाला रुमाल बांधावा आणि डोळ्याला गॉगल लावणे गरजेचे आहे. धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी.
- डॉ. भुस्कुटे, वैद्यकीय अधिकारी,
आरोग्य केंद्र, हातरुण.