रवी दामोदर/ अकोला : जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ९०८ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून, त्यापैकी ३ हजार २०४ ई-केवायसी करणे बाकी आहे. त्यामुळे इ-केवायसी बाकी असल्याने ते शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेच्या हफ्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान योजनेच्या परिपूर्ण अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात कृषी विभागाकडून गावपातळीवर संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये २१ फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी प्रमाणीकरण व इतर बाबींची पूर्तता करून घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी येथे दिली.
केवळ ई-केवायसी प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत प्रमाणीकरण पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी स्वत:चे ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाइलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
केंद्र शासन पीएम किसान योजनेचा १६वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करणार आहे. तसेच पीएम किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होणार आहे. या दोन्ही योजनांच्या लाभासाठी दि. २१ फेब्रुवारीपर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता या मोहिमेदरम्यान करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किरवे यांनी केले.