लोकमत न्यूज नेटवर्क
रंभापूर : अकोट तालुक्यातील रंभापूर येथील शेतकरी ‘ई-पीक’ पाहणी ॲपला वैतागले आहेत. रंभापूर शिवारात ई-पीक पाहणी ॲपचा वापर करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन, नेटवर्क नसणे, मोबाईल हाताळता न येणे आदी कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेऱ्याची नोंदणी राहिल्याचे चित्र आहेे.
ॲपद्वारे पीक पेऱ्याची कशी नोंदणी करावी, याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोबाईल हाताळणे कठीण झाले आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे पीक पेऱ्याची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करावी, अशी मागणी होत आहे.
-----------------------
बहुतांश शेतकरी डिजिटल निरीक्षक आहेत. पदवीधर शेतकऱ्यांनासुद्धा ॲपद्वारे नोंदणी करता येत नसल्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
- धीरज गिते, उपसरपंच, गटग्रामपंचायत, सावरा-रंभापूर.
--------------
तलाठ्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागत असल्याने मग तलाठी काय कामाचे, असा प्रश्न निर्माण होत आहे. आमच्याकडे स्मार्ट मोबाईलच नाही, तर पीक पेरा कसा नोंदवावा.
- प्रमोद गिते, शेतकरी, मौजे रंभापूर.
------------------------
मी पदाचा नुकताच पदभार स्वीकारला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी मी समजू शकते. अशा पद्धतीच्या अडचणी सर्वांनाच आहेत. त्या लवकरच दूर करण्यात येतील.
- जयश्री बेलसरे, तलाठी, सावरा-रंभापूर.