संतोषकुमार गवई
पातूर : महसूल विभागामार्फत ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असून, या अंतर्गत पातूर तालुका जिल्ह्यात अव्वल क्रमांकावर असून, तालुक्यातील ६० टक्के शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेऱ्याची माहिती नोंदवली आहे. दुसऱ्या क्रमांकावर बार्शीटाकळी तालुका असून, तालुक्यातून ४३ टक्के शेतकऱ्यांनी माहिती नोंदवली आहे.
तालुक्यातील ९९ गावांमधून कृषक सर्व्हे क्रमांक २६,१४० आहेत. ‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या १५,७२५ आहे. पीक पाहणी अद्ययावत केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही ११,७८१ आहे. ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रमात शेतकऱ्यांनी मोबाईलमधील ‘ई-पीक पाहणी ’ ॲपव्दारे शेतातील पीक पेऱ्याची माहिती नोंदवणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून शेतातील पीक पेऱ्याची नोंदणी सुरु केली आहे. तहसीलदार दीपक बाजड यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी शेतकऱ्यांच्या संपर्कात असून, त्यामुळेच शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे. तसेच नोंदणी करण्यात अयशस्वी झालेल्या शेतकऱ्यांना तलाठी स्वतः नोंदणीसाठी मदत करणार असून, त्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर आहे.
------------------------------
नोंदणी करताना येताहेत अडचणी
पातूर तालुका ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी करताना प्रथमस्थानी असला, तरी अद्यापही ३,९४४ शेतकऱ्यांना नोंदणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुका डोंगरी विभागात असल्यामुळे नेटवर्कची समस्या आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांकडे स्मार्टफोनची संख्या कमी आहे. अनेकदा सर्व्हर डाऊन असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.
---------------------
तालुक्यातील तलाठ्यांची कठोर मेहनत, शेतकऱ्यांच्या प्रतिसादामुळे तालुक्यामध्ये ई-पीक पाहणी नोंदणी प्रगतीपथावर आहे.
- दीपक बाजाड, तहसीलदार, पातूर.
------------------
ई-पीक पाहणी प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा असला, तरी नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींचा निपटारा यंत्रणेने करणे आवश्यक आहे.
- दीपक इंगळे, शेतकरी, भंडारज बु.
-------
अशी आहे जिल्ह्याची स्थिती (१२ सप्टेंबरपर्यंत)
अकोला जिल्ह्यात सात तालुक्यांपैकी
पातूर तालुका ६०.६४ टक्के,
बार्शीटाकळी ४३. ३९ टक्के,
मूर्तिजापूर ४२.९४ टक्के,
अकोट ४२.६२ टक्के,
बाळापूर ३६.१७ टक्के,
तेल्हारा २३.१० टक्के
अकोला तालुका २०.४५ टक्के.