- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ई-पीएफचे कार्यालयीन पोर्टल दर महिन्याच्या १५ तारखेनंतर ‘स्लो’ होत असल्याने अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यांतील पेन्शनधारक आणि कर्मचारी त्रासले आहेत. एकीकडे कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाची संपूर्ण यंत्रणा आॅनलाइन होत असताना कार्यालयाची तांत्रिक यंत्रणाच लंगडी असल्याने कामाची गती मंदावली आहे. १५ तारखेनंतर दस्तऐवज अपलोड होत नसल्याने कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हक्काची रक्कम मिळण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.कर्मचारी भविष्य निधी संघटन कार्यालयामार्फत प्रत्येक कर्मचाºयाची महिन्यातून कपात होते. शासकीय कार्यालयापासून तर खासगी कंपनीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांची दरमहा कपात केली जाते. आजार, शिक्षण, घर बांधकाम तसेच लग्नासाठी ही रक्कम काढण्याची मुभा आहे. पूर्वी ही रक्कम काढण्यासाठी ई-पीएफ कार्यालयाचे उंबरठे झिजविले जायचे. कर्मचाºयांना होणारा त्रास आणि कर्मचाºयांवरील ताण दूर करण्यासाठी काही वर्षांपासून ई-पीएफ कार्यालयाचे कामकाज आॅनलाइन झाले. कर्मचाºयांची संपूर्ण माहिती आॅनलाइन अपलोड करण्याची सक्तीदेखील या कार्यालयाने केली आहे. त्यामुळे संगणक निरक्षर असलेल्यांची मोठी कोंडी होत आहे. या सेवेसाठी ई-पीएफ कार्यालयाने प्रत्येक ठिकाणीदेखील एक संगणक दालन उघडले आहे. अकोल्यातील सिव्हिल लाइन चौकातील कार्यालयात,अकोलासह वाशिम आणि बुलडाणा येथील निरक्षर वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचारी आणि कर्मचारी हक्काची रक्कम मिळण्यासाठी येतात; मात्र दर महिन्याच्या १५ तारखेनंतर पोर्टलवर लोड असल्याने कर्मचाºयांचे अर्ज आणि त्याचे दस्तऐवज अपलोड होत नाहीत.त्यामुळे तिन्ही जिल्ह्यांतील गरजवंतांना रक्कम मिळण्यास विलंब होण्यासोबतच त्यांची फरपट होत आहे. ई-पीएफ पोर्टलची क्षमता वाढविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेनंतर साइट स्लो होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. १३ आणि १४ फेब्रुवारी २० रोजी सिस्टीम बंद पडली होती. तिन्ही जिल्ह्यांतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाºयांचे प्रकरण येथे असल्याने कामकाज काही प्रमाणात प्रभावित होते; मात्र ही स्थिती कायमस्वरूपी राहत नाही.-सुशांत पाटील,सहायक आयुक्त, कर्म. भविष्य निधी कार्यालय अकोला.