चायनीज खाण्याची आवड लहान मुलांसह तरुणांना अधिक असते. चायनीजबरोबर अजिनोमोटोचा वापर अतिप्रमाणात होत आहे. त्यामुळे तो शरीरासाठी हानीकारक ठरत असून, त्यांना न कळत पोटाचे विकार होत असल्याचे समोर आले आहे. अजिनोमोटोला एमएसजी म्हणजेच मोनो सोडियम ग्लूटामिट असे म्हणतात. चायनीजबरोबर नॉनव्हेज, तसेच इतर भाज्यांमध्येसुद्धा अजिनोमोटोचा वापर सर्रास केला जातो. अतिप्रमाणात सेवन केल्यास यामुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटीने वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच आतड्याचे, पोटाचे कर्करोगसुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
काय आहे अजिनोमोटो?
‘अजिनोमोटो’ नावाची कंपनी तयार करीत असलेल्या ‘फ्लेव्हर एन्हान्सर’चे शास्त्रीय नाव ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’ आहे. त्यात सोडियम, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये असतात. व्हिनेगरप्रमाणेच अजिनोमोटोही आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार होते. पण तो जास्त वापरला गेला, तर मात्र पदार्थाची चवच बिघडते असे नाही, तर खाणाऱ्याचे आरोग्यही बिघडू शकते.
...म्हणून चायनीज खाणे टाळा
चायनीज पदार्थामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यासारखे जिन्नस वापरल्यामुळे पचनशक्तीवर ताण येऊन ती बिघडू शकते. ‘रोडसाईड चायनीज फूड’मध्ये वापरला जाणारा तांदूळही पॉलिश्ड किंवा रिफाईंड असल्याने पचनसंस्थेसाठी हितकर नसतो.
प्रशासनाचे हवे नियंत्रण
अनारोग्यदायक चायनीज पदार्थावर अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण आवश्यक आहे. खरे तर ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’चा वापर कोणत्या पदार्थामध्ये करावा, त्याची ‘गुड मॅन्युफॅक्चुअरिंग लेव्हल’ काय असावी या सर्वाची अन्नसुरक्षा कायद्यामध्ये (फूड सेफ्टी अॅक्ट) तरतूद आहे.