महापालिकेत स्थायी समितीच्यावतीने सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. दरम्यान, घराेघरी जाऊन तसेच बाजारपेठेतून दैनंदिन कचरा संकलन करणारी वाहने भाडेतत्वावर दिल्यास मनपाला उत्पन्न प्राप्त हाेईल,या विचारातून प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली. यामध्ये उत्पन्नातून सात टक्के रक्कम राॅयल्टी मनपाला देणाऱ्या स्वयंभू ट्रान्सपाेर्ट पुणे यांची निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केला. याविषयावर सेनेचे गटनेता राजेश मिश्रा, माजी स्थायी समिती सभापती सतीश ढगे, आशिष पवित्रकार, पराग कांबळे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले असता नगरसचिव तथा आराेग्य व स्वच्छता विभाग प्रमुख अनिल बिडवे यांनी खुलासा केला. यावेळी राजेश मिश्रा व सतीश ढगे यांच्यात शाब्दिक बाचाबाची हाेत असतानाच सभापती संजय बडाेणे यांनी प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव बाजूला सारत चंद्रपूर जिल्ह्यातील भगत प्लास्टीक, बल्लारपूर यांची निवड करीत असल्याचे स्पष्ट केले. यावर राजेश मिश्रा यांनी तीव्र आक्षेप घेतला.
कंत्राटदाराची स्थायी समितीकडे धाव
प्रशासनाने सादर केलेल्या टिप्पणीत भगत प्लास्टीक, बल्लारपूर यांनी सादर केलेले दर उणे ७.९९० हाेते. तर स्वयंभू ट्रान्सपाेर्टचे दर ७ टक्के हाेते. निविदा प्रसिध्द झाल्यानंतर भगत प्लास्टीकच्या कंत्राटदाराने सर्वाधिक दर देणार असल्याचे नमूद करीत स्थायी समिती सभापतींकडे धाव घेतली. तांत्रिक घाेळ झाल्याचे सांगत सभापतींनी प्रशासनाचा प्रस्ताव बाजूला सारला.
अकाेलेकरांची लूट थांबवा!
कंत्राटदार अकाेलेकरांना किती शुल्क आकारणार, असा प्रश्न राजेश मिश्रा यांनी विचारला असता कंत्राटदार व मनपाकडून दाेन महिन्यात संयुक्त सर्वे केला जाणार असून त्यानंतर शुल्क निश्चित केले जाइल,असे अनिल बिडवे यांनी सांगितले. त्यावर टॅक्स दरवाढीच्या माध्यमातून अकाेलेकरांची लूट सुरु असतानाच आता शुल्कवाढीतूनही लूट केली जाणार असल्याची टीका मिश्रा यांनी केली.