अकोला: सध्या अनेकांसमोर वाढते वजन, मधुमेहाचा मोठा प्रश्न आहे. वजन वाढले. मधुमेह वाढला. आता त्यावर नियंत्रण कसे ठेवावे, वजन कसे कमी करावे, या चिंता माणसाला सतावतात. वजन आणि मधुमेह यापासून दूर राहायचे असेल, तर सर्व काही खा; परंतु खाण्यावर नियंत्रण ठेवा, बकाबका खाऊ नका, दिवसातून दोन वेळा खा, योगा, व्यायाम आणि पायी फिरण्याकडे लक्ष द्या, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी अकोलेकरांना दिला.आयएमए, अग्रवाल समिती, माहेश्वरी समाज ट्रस्ट, रोटरी परिवारच्यावतीने रविवारी दुपारी ४ वाजता प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित वेट लॉस व मधुमेह प्रतिबंध विषयावर डॉ. दीक्षित बोलत होते. यावेळी मंचावर आयएमएच्या डॉ. अनिता खंडेलवाल, रोटरीचे सहायक प्रांतपाल दीपक गोयनका, अग्रवाल समितीचे सहसचिव अॅड. सुरेश अग्रवाल, माहेश्वरी समाज ट्रस्टचे डॉ. संदीप चांडक आदी होते.डॉ. दीक्षित पुढे म्हणाले, वजन का वाढत आहे, याचा विचार करा. मुले सर्रास कोल्ड्रिंक्स, बर्गर, पिझ्झा खाताना दिसतात. वय, लिंग, आनुवंशिक घटक, सामाजिक-आर्थिक परिस्थिती, मेहनतीचा अभाव, भोजन बनविण्याची पद्धती, शिक्षण, हार्मोन्स, मद्यपान, धूम्रपान, वंश आदी वजन वाढण्याची कारणे आहेत. अनेकांना वजन कमी करायचे असते; परंतु त्यासाठी शारीरिक श्रम अनेकांना नको असतात. त्यांना शॉर्टकट पद्धत हवी असते. वजन कमी करायचे असेल, तर एक दिवस उपवास करा, रात्री केवळ फळ खा, रसाहार, निराहार करा, दर तीन तासांनी थोडेथोडे खा, तसेच आयुर्वेदिक, होमिओपॅथीची औषधे घ्या, असे सांगत, डॉ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले, की खाण्यासाठी जीवन जगू नका, तर जगण्यासाठी खा...जे काही खायचे आहे, ते खा; परंतु दिवसातून दोन वेळा खा, तुम्ही काहीही खाल्ले तरी शरीरात इन्सुलिन निर्माण होते. वजन आणि मधुमेहाला प्रतिबंध करायचा असेल, तर खूप भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा, भोजनाची वेळ निश्चित करा आणि त्याच वेळेत भोजन करा, तसेच ५५ मिनिटांमध्ये भोजन संपवा, असे सांगत त्यांनी दोन भोजनाच्या मधात काही खाऊ नका आणि भोजनात गोड कमी खा, भोजनात प्रोटिन्स वाढविण्याचा सल्लाही त्यांनी दिला. प्रास्ताविक डॉ. जुगल चिराणिया यांनी तर परिचय आयएमएचे सचिव डॉ. अजयसिंह चौहान यांनी करून दिला. आभार राजीव बजाज यांनी मानले.
खासदार, महापौरांची कार्यक्रमाला पूर्णवेळ उपस्थितीडॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या कार्यक्रमाला खासदार संजय धोत्रे, सुहासिनी धोत्रे, महापौर विजय अग्रवाल यांनीही हजेरी लावली. प्रारंभी त्यांनी डॉ. दीक्षित यांचे स्वागत केले. त्यानंतर खासदार धोत्रे, महापौर अग्रवाल यांनी पूर्णवेळ नागरिकांमध्ये बसून डॉ. दीक्षित यांचे व्याख्यान ऐकले.