लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोर्णा नदीत असलेले घाण पाणी व गणेश भक्तांना आता गणेश विसर्जनासाठी योग्य सुविधा नसल्याने नगरसेवक विनोद मापारी यांच्या संकल्पनेतून रिंग रोडवरील रविनगरमध्ये असलेल्या छत्रपती उद्यानामध्ये इको फ्रेंडली छत्रपती गणेश विसर्जन घाट तयार करण्यात आला आहे. स्वच्छ पाण्यासह दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी राहणार असल्याने गणेश भक्तांनी या इको फ्रेंडली घाटावर गणेश विसर्जन करण्याचे आवाहन नगरसेवक विनोद मापारी यांनी केले आहे. नगरसेवक विनोद मापारी मित्र परिवाराद्वारे हा इको फ्रेंडली गणेश विसर्जन घाट तयार करण्यात आला आहे.कौलखेड, तुकाराम चौक, रिंग रोडसह शहारातील कौटुंबिक गणेश विसर्जनासाठी गणेश भक्तांना या इको फ्रेंडली घाटावर गणेश विसर्जन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. छत्रपती उद्यान रविनगर रिंग रोड कौलखेड या ठिकाणी हा सुंदर घाट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी या ठिकाणी विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलसंजय सवाई आणि त्यांच्या ग्रुपद्वारे ‘गीतमाला’ सकाळी १0 ते १२ वाजेपर्यंत राहणार आहे. नाट्यकर्मी रमेश थोरात यांचा एकपात्री नाट्य प्रयोग दुपारी १२ ते १, त्यानंतर दुपारी १ ते ३ महिला भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३ ते ४ एक मिनीट स्पर्धा व उखाणे स्पर्धा, त्यानंतर दुपारी ४ ते ५ उच्च विद्याविभूषित जीवनबाप्पू देशमुख प्रस्तुत बाल संस्कार प्रबोधन, सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत गोपाल मापारी, संतोष कोकाटे, प्रा. संजय कावरे, विनोद वीरघट हास्य कविसंमेलन प्रस्तुत करणार आहेत. सायंकाळी ७ ते ७.३0 या दरम्यान दीप महोत्सव व महाआरती, सायं. ७.३0 ते रात्री ९ वाजेपर्यंत नादब्रह्म अँकॅडमी, केशवनगर प्रस्तुत संगीत संध्या राहणार आहे.
असे राहील विशेष आकर्षणइको फ्रेंडली घाटावर गणेश विसर्जनाच्यावेळी येणार्या भाविकांचे स्वागत करण्यासाठी भाविक भक्तांसह श्री गणरायाचे स्वागत सनई चौघडा व तुतारीच्या निनादात करण्यात येणार आहे. माताभगिनीद्वारे पुष्पवृष्टी व औक्षण करण्यात येणार असल्याने, हा अनोखा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.