लाॅकडाऊन हे कुणालाच परवडणारे नाही; मात्र कोरोनाचा वारंवार होणारा उद्रेक जिल्ह्याला लॉकडाऊनकडे ढकलतो. त्यामुळे लाॅकडाऊन हा पर्याय टाळायचा असेल तर नियम पाळणे आवश्यक ठरते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येचा मोठा विस्फोट झाला. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची भयावह संख्या समोर आली. त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली हाेती. या नियमांची सक्त अंमलबजावणी केल्याने अकाेल्याचे अर्थचक्र ठप्प झाले हाेते. साेमवारपासून जिल्ह्यात दुपारी चारपर्यंत अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक व्यावसायिकांना सूट मिळाली. जिल्ह्यातील व्यवहार सुरू झाल्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी बाजारातील तुडुंब गर्दीमुळे प्रशासनाला मात्र कोरोना वाढण्याची चिंता लागली आहे.
या मार्गावर सर्वाधिक गर्दी
ताजनापेठ ते जैन मंदिर व गांधी रोड, टिळक रोड, मोहम्मद अली रोड या मार्गांवर सर्वाधिक गर्दी होत आहे. सोबतच रेल्वे स्टेशन रोड, बस स्टँड चौकात वर्दळ वाढली आहे.
....................
बेफिकिरी टाळा...धाेका कायमच आहे !
कडक निर्बंधांमुळे सर्वच घरात बंद होते. व्यवसाय बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता सूट मिळाल्यामुळे नागरिक बेफिकीर झाले आहेत. पहिल्या लाटेनंतर असेच नागरिक बेफिकीर झाल्याने दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागले हाेते. आता दुसरी लाट ओसरत असल्याने नागरिकांनी बेफिकीर न हाेता नियम पाळण्याची गरज आहे.
...............
दुकानांची साफसफाई अन् ग्राहकांचे स्वागत
अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानांना सूट मिळाल्याने साेमवारी ही दुकाने उघडण्यात आली होती. खूप दिवसांनी दुकान उघडण्याची वेळ आल्याने बहुतांश दुकानदारांनी तातडीने साफसफाई करीत ग्राहकांचे स्वागत केले.
.....................