लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अँड. सैयद नातीकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालकांविरुद्ध पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बाळापूर पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केली आहेत. बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेने आकर्षक व्याजदराचे आमिष दाखविल्याने अनेक ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या होत्या. गुंतवणूकदारांनी ठेवलेल्या ठेवींचा वापर अध्यक्षासह संचालकांनी दुसर्या नावाने कर्ज दाखवून स्वत:च केल्याचा आरोप रामदास श्रीराम पराते रा. रंगाहट्टी बाळापूर यांनी अकोला आर्थिक गुन्हे शाखेत दिलेल्या फिर्यादीत केला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास करून १६ फेब्रुवारी रोजी अध्यक्षासह संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी प्रकरण बाळापूर पोलिसांकडे पाठविले होते. त्यावरून बाळापूर पोलिसांनी बाळापूर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सै. नातीकोद्दीन सै. हुसामोद्दीन खतीब, उपाध्यक्ष श्याम शेगोकार, संचालक माजी नगराध्यक्ष रजीयाबेगम सै. नातीकोद्दीन खतीब, सै. हमीदोद्दीन सै. जमीरोद्दीन, नंदकिशोर पंचभाई, मो. हनीफ मो. मुनाफ, निजामोद्दीन सफीयोद्दीन, सै. मुजीब सै. हबीब, निर्मला श्रीकृष्ण उमाळे, शे. महेबुब शे. हसन, शे. वजीर शे. इब्राहीम यांच्याविरुद्ध ४0६, ४0९, ४१८, ४६७, ४६८, ४७१, ५0४, १२0 ब भादंवि आरडब्ब्ल्यू ३, ४ एमपीआयडी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे करीत आहेत. याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष अँड. सैयद नातीकोद्दीन खतीब यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
ठेवीदारांनी केले होते उपोषण बाळापूर नागरी पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी अनेक ठेवीदारांनी काही दिवसांपूर्वी उपोषण केले होते. ग्राहक मंचानेही पतसंस्थेविरुद्ध निकाल दिला होता. उपोषणकर्त्या ठेवीदारांना ठेवीतील काही रक्कम देण्याची तयारी पतसंस्थेने दाखविल्यानंतर या उपोषणाची सांगता झाली होती.