लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा आहेत की नाहीत, याची माध्यमिक शिक्षण विभागाकडून तपासणी करून मूल्यांकन करण्यात येणार होते. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून माहितीसुद्धा मागविण्यात आली; परंतु शिक्षण विभागाला कनिष्ठ महाविद्यालयांच्या तपासणीसोबतच मूल्यांकनालासुद्धा खो दिल्याचे दिसून येत आहे. महापालिका क्षेत्रातील अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे, शुद्ध पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी टेबल, खुर्च्या, ग्रंथालय, पाठ्यपुस्तकांची सुविधा नाही; परंतु सुविधांच्या नावाखाली अपप्रचार करून कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश देतात; परंतु त्यांना भौतिक सुविधा देण्यात येत नाहीत. शिक्षण हक्क कायदा २00९ नुसार विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देणे बंधनकारक आहे; परंतु कनिष्ठ महाविद्यालये त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी दोन महिन्यांच्या सुटीच्या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या येथे भौतिक सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, असे आदेशही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. तसेच उपशिक्षणाधिकाऱ्यांची समिती कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधांची तपासणी मे महिन्यात करेल. असेसुद्धा स्पष्ट केले होते. तपासणी केल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यात येईल, असेही म्हटले होती; परंतु मे महिना उलटून गेल्यानंतरही समितीकडून कोणतीही तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमधील भौतिक सुविधांचे मूल्यांकन करण्याला शिक्षण विभागाने खो दिला असल्याचे दिसून येत आहे. कनिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यास अद्याप बराच अवधी आहे. मूल्यांकनासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी भौतिक सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. महाविद्यालयांमधील भौतिक सुविधांची पाहणी केल्यानंतरच मग मूल्यांकन करू. - दिनेश तरोळे, उपशिक्षणाधिकारी
महाविद्यालय मूल्यांकनाला शिक्षण विभागाचा खो!
By admin | Published: June 07, 2017 1:13 AM