अकोला: महापालिकेच्या शिक्षण विभागाने गत तीन दिवसात अचानक सकाळच्या सत्रातील शाळांची तपासणी केली असता, तब्बल ९९ शिक्षक व कर्मचारी कामावर उशिरा पोहोचल्याचे उघडकीस आल्याने त्यांना नोटिस बजावून एक दिवसाची वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महापालिकेतील शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराला रुळावर आणण्यासाठी कामचुकार कर्मचार्यांवर थेट कारवाई करण्याचा आदेश आयुक्त अजय लहाने यांनी जारी केला आहे. मनपाच्या स्थापनेला १४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर शिक्षण विभागाने चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी यंदा सेमी इंग्लिश व बालवाडीचा प्रस्ताव लागू केला. केवळ वेतन व विविध भत्ते लाटण्यासाठी शिक्षक संघटनांच्या माध्यमातून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करणार्या शिक्षकांनी कधीही विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. परिणामी विद्यार्थी संख्या कमी झाल्याची सबब पुढे करीत, २00६-0७ मध्ये ७८ शाळांपैकी २३ शाळांचे समायोजन करण्यात आले. खासगी शाळांच्या तुलनेत मनपा शाळांमधील शिकवण्याची रटाळ पद्धत, सेमी इंग्लिश-बालवाडीचा अभाव आदी कारणांमुळे पुन्हा विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली. मर्जीच्या शाळेवर २0-२0 वर्षे ठाण मांडणार्या कामचुकार शिक्षकांमुळे यावर्षी नव्याने शाळांचे समायोजन करण्यात आले. एप्रिल २0१५ मध्ये ५५ शाळांपैकी तब्बल २३ शाळांचे समायोजन करण्यात आल्याने, सध्या शहरात मनपाच्या केवळ ३२ शाळा शिल्लक असून, त्यादेखील अस्तित्वाची लढाई लढत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचे कामकाज रुळावर आणण्यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने आग्रही आहेत.
महानगर पालिकेच्या ९९ शिक्षकांना शिक्षण विभागाची नोटिस!
By admin | Published: December 05, 2015 9:09 AM