अकोला: समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो. आता पश्चिम विदर्भातील तालुकानिहाय शाळाबाह्य मुले शोधून त्यांना शिक्षण हमी कार्ड देणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वयंस्फूर्तीने समोर आलेल्या शिक्षकांची बालरक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.अकोला जिल्ह्यासोबतच पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य विद्यार्थी आहेत, तसेच शाळेत एक महिन्यापेक्षा अधिक गैरहजर राहणारे, विद्यार्थी, शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या शोधासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय नेमलेल्या बालरक्षकांच्या बैठका घेण्यात आल्या असून, प्रत्येक शाळा स्तरावर शाळाबाह्य मुले शोधून त्यांना पूर्णत: शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेतल्यानंतर त्यांना शिक्षण हमी कार्ड देण्यात येणार आहे. या मुलांनी आणखी कुठे स्थलांतर केले तर त्यांना दिलेल्या शिक्षण हमी कार्डच्या माध्यमातून पुढील शिक्षणासाठी त्यांना दाखल करण्यात येणार आहे. यंदा जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक सातत्यपूर्ण विकास संस्थेने सरल प्रणाली ड्रॉफ बॉक्स निरंक करण्याचे उद्दिष्ट ठेवून अकोला जिल्हा शाळाबाह्य विद्यार्थीविरहित करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेसाठी समन्वयक म्हणून डॉ. विकास गावंडे, कविता बोरसे हे काम पाहत आहेत. शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी तुलसीदास खिरोडकर, मंगेश दसोळे, मुरलीधर कुलट, रितेश नीलेवार, सुधाकर पिंजरकर, अनिकेत मांडे ही चमू जिल्ह्यात कार्यरत असून, त्यांना ७२४ बालरक्षकांची मदतसुद्धा मिळणार आहे. (प्रतिनिधी)
शाळाबाह्य मुले शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी या मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्यात येईल. त्यासाठी ७२४ बालरक्षक नेमण्यात आले आहेत. तालुकानिहाय बैठका घेण्यात आल्या आहेत.डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य,जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक सातत्यपूर्ण विकास संस्था.