अकोला : पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खोपडी या गावातील महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीच्या पत्नीने व मुलाने महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी या दोघांना अॅट्रासिटी कायद्यानुसार तीन महिन्यांची शिक्षा न्यायालयाने सुनावली, तसेच तीनही आरोपींना २२ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.खोपडी येथील रहिवासी ३५ वर्षीय महिला एकटी असल्याची संधी साधत रामराव मोतीराम ठाकरे याने महिलेच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला होता. महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताच महिला घर सोडून पळून गेली होती. त्यानंतर थेट रामराव ठाकरे यांची पत्नी मनोरमा ठाकरे व मुलगा अनंता ठाकरे या दोघांना घडलेला प्रकार महिलेने सांगितला. यावर या दोघांनी महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणाची तक्रार महिलेने पिंजर पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ४५२, २९४, ३४ आणि अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल केले होते. प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मी नांदेडकर यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने आठ साक्षीदार तपासल्यानंतर मोतीराम ठाकरे याला अॅट्रासिटी आणि विनयभंग प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा तसेच १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला तर त्याची पत्नी मनोरमा आणि मुलगा अनंता या दोघांना जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे तीन महिन्यांची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या २२ हजार रुपयांच्या रकमेतील २१ हजार रुपये दंड पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. श्याम खोटरे यांनी कामकाज पाहिले.
विवाहितेचा विनयभंग करणाऱ्यास शिक्षा
By admin | Published: April 06, 2017 1:22 AM