अकोला: महापालिकेच्या शाळेत अंगणवाडीचे स्थानांतरण होऊ शकत नाही. त्यामुळे मनपा शाळेतील बंद असलेले बालवाडीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव भाजपाचे गटनेता राहुल देशमुख यांनी मांडला. त्यावर बालवाडी सुरू करण्यासंदर्भात मनपा आयुक्त संजय कापडणीस व शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. या मुद्यावर सर्वपक्षीय गटनेत्यांनी प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून बालवाडी सुरू करण्याची सूचना केली आहे, हे येथे उल्लेखनीय.मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून, मराठी माध्यमाच्या शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ आली आहे. पटसंख्या वाढीला हातभार लागण्यासोबतच गोरगरीब कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशातून तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये मनपा शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग सुरू केले होते. यादरम्यान, २०१८ मध्ये मनपा शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंगणवाड्यांचे मनपा शाळेत स्थानांतरण करण्याचे निर्देश बालविकास विभागाच्या आयुक्तांनी दिले. त्यानुषंगाने बालविकास विभाग व मनपाच्या संयुक्तिक सर्व्हेनंतर मनपाच्या ३३ पैकी फक्त पाच शाळांमध्ये अंगणवाडी सुरू करता येणार असल्याने हा प्रस्ताव फिस्कटला. या कालावधीत प्रशासनाने बालवाडीचे वर्ग बंद केल्याचा मुद्दा भाजपाचे गटनेता राहुल देशमुख यांनी उपस्थित केला. गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून बालवाडीचे वर्ग सुरू करण्याची मागणी गटनेता देशमुख यांनी केली. त्यावर महापौर अग्रवाल यांनी शिक्षणाधिकाºयांना माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. सभागृहातील गोंधळ लक्षात घेता बालवाडी संदर्भात आयुक्त कापडणीस व शिक्षणाधिकारी सुलताना यांनी निर्णय घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले.सुरक्षितता धोक्यात!वयाची सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मनपाच्या शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश घेता येतो. तोपर्यंत अशा लहान मुला-मुलींना घरीच राहावे लागते. शहराच्या स्लम भागातील लहान मुलांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आल्याचे चित्र आहे. या सर्व बाबींचे भान ठेवून मनपाने बालवाडीचे वर्ग सुरू करण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.