संतोष येलकर, अकोला: ग्रामीण भागात आजही पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ४.०८ टक्के असून, ही समस्या निकाली काढण्यासाठी शासनाने पदवीपर्यंतचे शिक्षण हा साक्षरतेचा मापदंड मानावा , असे मत नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांनी १५ एप्रिल रोजी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता, ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट देवून, संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत केले. देशात शिक्षणक्रांती झाली पाहीजे. त्यामध्ये शासनाने पदवीपर्यंतचे शिक्षण साक्षरतेचे प्रमाण मानावे , यादृष्टीने आंबेडकरवादी मिशनच्यावतीने विशेष अभियान राबविण्यात येत असून, जनजागृती केली जात आहे. या अभियानात राज्यातील प्रत्येक जिल्हयात शिक्षण परिषद घेवून शिक्षणाचे ‘आॅडीट’ केले जाइल, अशी माहती दिपक कदम यांनी दिली. तळागाळातील विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जावून सामाजिक बांधिलकीतून काम करावे, या हेतूने आंबेडकरवादी मिशनचे काम सुरु आहे. त्यामध्ये मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत १८२ आयएएस, आयपीएस अधिकारी आणि २०० पेक्षा अधिक पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय) दर्जाचे अधिकारी तयार झाले असून, प्रशासकीय अधिकारी निर्मितीचे काम मिशनच्या माध्यमातून सुरु असल्याचे कदम यांनी सांगीतले.
अधिकाऱ्यांनी मानवी चेहऱ्याने काम केल्यास समस्या निकाली निघतील!
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मानवी चेहऱ्याचे होवून काम केल्यास समाजाच्या बहुतांश समस्या निकाली निघतील, या जाणिवेतून आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी निर्मितीचे काम सुरु आहे, असे दिपक कदम म्हणाले.
३०० विद्यार्थ्यांकडून स्पर्धा, परिक्षेची तयारी सुरु!
नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनमध्ये गोरगरिब, सर्वसामान्य कुटुंबातील ३०० पदवीधर विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, संबंधित विद्यार्थ्यांकडून यूपीएससी, एमपीएससी, बॅंकींग आदी स्पर्धा परिक्षेची तयारी केली जात आहे. तसेच दरवर्षी किमान १०० गरिब व गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेवून, कोणतेही शुल्क न घेता,त्यांना स्पर्धा परिक्षेसाठी तयार करण्याचे काम आंबेडकरवादी मिशनकडून करण्यात येत आहे, असेही दिपक कदम यांनी सांगीतले.