अकोला: शासन शिक्षणविरोधी धोरण राबवित असून, त्याविरुद्ध शिक्षण संस्था संचालक संघटना व शिक्षक संघटना एकवटल्या आहे. या संघटनांनी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी घोषित केलेल्या राज्यव्यापी लाक्षणिक एक दिवसीय शाळा बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण संस्था संचालक मंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय कौसल यांनी शनिवारी जागृती विद्यालयात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.पवित्र पोर्टलमधील अन्यायकारक तरतुदी रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, २0 टक्के अनुदानित शाळेला प्रचलित नियमानुसार अनुदान देणे, अघोषित शाळा, महाविद्यालयांना निधीसह जाहीर करा, सुधारित आकृतिबंध लागू करा, सातवा वेतन आयोग लागू करा, यासह विविध मागण्यांसाठी २ नोव्हेंबर रोजी शाळा बंद करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शिक्षक संघटनांनीसुद्धा पाठिंबा दिला आहे. बैठकीला विजुक्टाचे प्रांताध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, मुख्याध्यापक संघाचे विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, जिल्हाध्यक्ष बळीराम झामरे, शिक्षक आघाडीचे आनंद साधू, शिक्षक सेनेचे नरेंद्र लखाडे, शिक्षकेतर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विलास अत्रे, जिल्हाध्यक्ष डॉ. विजय ताले, संस्थाचालक डॉ. सुबोधचंद्र लहाने, पुष्पा गुलवाडे, शिक्षक परिवर्तन आघाडीचे प्रकाश डवले, अल्पसंख्यक संस्था महासंघाचे अध्यक्ष डी.जी. खान, सचिव मो. फारुख, उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. साबीर कमाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत विजय कौसल, अॅड. विलास वखरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थाचालक मंडळाचे शशीधर खोटरे, प्रवीण लाजुरकर, दीपक बिरकड, विनोद सदाफळे, बाळकृष्ण गावंडे, असिमोद्दीन, डॉ. गणेश घोगरे, पंकज देशमुख, निनाद आठवले, डॉ. केशव अवताडे, सुरेश फाळके, अरुण लौटे, संतोष मानकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)