अकोला: विविध योजनांमध्ये पात्र असलेल्या परंतु अद्यापपर्यंत लाभ न मिळालेल्या व्यक्तींपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक संचालक रोशन थॉमस यांनी गुरुवारी येथे दिले.
मोहिमेच्या तयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, समन्वय अधिकारी गजानन महल्ले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
योजनांमध्ये पात्र असूनही अद्याप लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ मिळवून देणे, योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदी कार्यवाही मोहिमेद्वारे केली जाणार असून, वंचित समुदायासाठी असलेल्या योजनांच्या जनजागृतीचे ध्येय ' विकसित भारत संकल्प यात्रे' तून साध्य होणार असल्याचे थॉमस यांनी सांगितले.
१५ नोव्हेंबर रोजी ही मोहीम देशभरात कार्यान्वित करण्यात आली असून, २६ जानेवारीपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे झाला. या यात्रेत सुरुवातीला लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांत आणि नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून २६ जानेवारीपर्यंत उर्वरित जिल्ह्यांत ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे.त्यामध्ये नोव्हेंबरच्या दुस-या पंधरवड्यात ही यात्रा अकोला जिल्ह्यात भेट देणार आहे. अशी माहिती देत, संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून ही मोहिम यशस्वी करावी, असे निर्देशही संचालक थॉमस यांनी दिले.