अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कोविड लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी शुक्रवारी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त नीमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, मनपाचे उपायुक्त पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी निलेश अपार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. एम.डी. अष्टपुत्रे, डॉ. एन.ए. अंभोरे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या, मृत्युसंख्यावाढ तसेच कोविड लसीकरण मोहिमेचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला. लस उपलब्धतेबाबत माहिती घेऊन शहरी व ग्रामीण भागात विशेष लक्ष केंद्रित करून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्याकरिता जनजागृती अभियान राबविण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले.
‘होम आयसोलेशन’मधील व्यक्तींच्या हातावर शिक्के मारा!
होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तींच्या हातावर शिक्के मारून होम आयसोलेशनच्या ठिकाणी स्टिकर लावून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आरटीपीसीआर व रॅपिड टेस्टचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या.
........................फोटो.........................