अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर महिलेने दिवसाढवळ्या प्रवेश करून स्तनदा मातेकडून तिच्या बाळाला हिसकण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाच्या सुरक्षा रक्षकांनी सतर्कता बाळगून सदर महिलेस पोलिसांच्या ताब्यात दिले. सिटी कोतवाली पोलिसांनी सदर महिलेस अटक केली असून, गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर अशी ओळख असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास एका वेडसर दिसणा-या महिलेने बालरोग चिकित्सा विभागातील वार्ड क्र. २३ मध्ये असलेल्या एनआयसीयूमध्ये प्रवेश केला. सदर महिला कुणाची नातेवाईक असेल म्हणून सुरक्षा रक्षकांनी तिला आत जाऊ दिले. यावेळी आतमध्ये सोनू संदीप अंबडारे (२६, रा. नागपूर-बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला) या त्यांच्या २१ दिवसांच्या बाळाला दूध पाजत होत्या.
महिलेच्या मांडीवरील बाळ हिसकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे भेदरलेल्या सोनू अंबडारे व जवळ बसलेल्या सुनीता महाकाळ यांनी आरडाओरड केल्याने एकच खळबळ उडाली. याप्रसंगी कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिका जया खांबालकर यांनी वेडसर महिलेस पकडून एनआयसीयू बाहेर काढले व सुरक्षा रक्षकांना पाचारण केले. सुरक्षा रक्षकांनी सदर महिलेस ताब्यात घेऊन तिला पोलिसांच्या ताब्यात दिले.