अकोला: मुस्लीम बांधवांचा पवित्र सण 'ईद' गुरुवार, ७ जुलै रोजी शहरात मोठय़ा उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध मशिदी व मदरशांमध्ये मुस्लीम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. शहरातील प्रसिद्ध असलेल्या मशीदमध्ये मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करण्यासाठी एकच गर्दी केली होती. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व मुस्लीम बांधवांनी यावेळी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. पवित्र रमजान महिन्याचे ३0 दिवसांचे रोजे संपल्यानंतर गुरुवारी शहरातील मुस्लीम बांधवांनी हरिहरपेठ, आकोटफैल, खदान तथा मुस्लीमबहुल वस्त्यांमधील ईदगाहमध्ये जाऊन सामूहिक नमाज अदा केली. नवीन कपडे परिधान करून ईदगाहवर पोहोचलेल्या मुस्लीम बांधवांनी एका ओळीमध्ये बसून सामूहिकरीत्या प्रार्थना केली. सकाळी १0.१५ वाजता मौलाना मोहम्मद मुस्तफा यांच्या उपस्थितीत अलहाज सैय्यद काजी काजिमुद्दीन यांनी अरबी खुतब्याचे पठन केले व त्यानंतर मुस्लीम बांधवांनी ईदच्या विशेष नमाज अदा केल्या. यावेळी नगरसेवक अलहाज सैय्यद नाजिमुद्दीन यांनी सर्वांना शांतता व बंधुभाव राखण्याचे आवाहन केले. तगड्या बंदोबस्तात शहरात ईद साजरी करण्यात आली.
जिल्हय़ात ठिकठिकाणी ईद उत्साहात
By admin | Published: July 08, 2016 2:19 AM