लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एकाच कुटुंबातील आठ पॉझिटिव्ह रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल होण्यासाठी तब्बल सहा तास प्रतीक्षा करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. अखेर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर सहा तासांनी या आठ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले.विदर्भात नागपूरनंतर सर्र्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अकोल्यात आढळून येत आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी करून मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच रुग्णांना सुविधा देण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाºयांच्या या निर्देशाला २४ तासातच केराची टोपली दाखविण्यात आल्याचा प्रकार रविवारी समोर आला. सिंधी कॅम्प येथे शनिवारी स्बॅब संकलन शिबिर पार पडले. या शिबिरातील ६३ संदिग्ध रुग्णांपैकी १७ जणांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. यापैकी एकाच कुटुंबातील आठ पॉझिटिव्ह सदस्य दाखल होण्यासाठी सकाळी १० वाजता सर्वोपचार रुग्णालयात पोहोचले. तेथे वॉर्ड क्र. २४ मध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या आठ रुग्णांना तीन तास वाट पाहावी लागली. त्यानंतर तत्काळ या रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे अपेक्षित होते; परंतु या ठिकाणीही त्यांना प्रतीक्षा करावी लागली. या आठही रुग्णांना वॉर्ड क्र. ३१ मध्ये बसवून ठेवण्यात आले. कोणत्याही हालचाली होत नसल्याचे पाहून या रुग्णांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. ‘लोकमत’ने या संदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर व जीएमसीचे उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी तत्काळ दखल घेत या रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित डॉक्टरांना दिले. त्यानंतर या रुग्णांना वॉर्ड क्र. ३१ मध्ये बेडची व्यवस्था करण्यात आली. या सर्व प्रक्रियेत रुग्णांना तब्बल सहा तास ताटकळत राहावे लागले.
आठ पॉझिटिव्ह रुग्णांना भरती होण्यासाठी करावी लागली सहा तासांची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 10:30 AM