अकोला: अकोल्यात इंग्लंडमधून आठ जण दाखल झाल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाने शुक्रवारी दिली. या सर्वांची मुंबई विमानतळावर वैद्यकीय चाचणी झाली असून, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. खबरदारी म्हणून या सर्वांना पुढील आठ दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. कोरोनावर लवकरच लस येणार असल्याने मोठा दिलासा मिळाला होता; परंतु इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल झाल्याने कोरोनाचे नवे संकट जगासमोर आले आहे. खबरदारी म्हणून केंद्र शासनाने इंग्लंडमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवासी भारतीयाची तपासणी करून त्यांच्यावर निगराणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार इंग्लंडहून आलेल्या प्रत्येक प्रवाशाचा शोध घेण्याची मोहीम राज्यभरात सुरू करण्यात आली आहे. विमानसेवा प्राधिकरणाने आरोग्य विभागाला दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडहून अकोल्यात आठ प्रवासी दाखल झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी या आठही नागरिकांशी संपर्क साधला असून, त्यांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी केली. मुंबई विमानतळावर करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत अकाेल्यातील आठही प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. खबरदारी म्हणून आठही जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
धोका कमी, पण सतर्कता आवश्यक
इंग्लंडमधून येणाऱ्यांची संख्या कमी असून, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. अद्याप तरी यातील एकही जण पॉझिटिव्ह नाही. त्यामुळे नव्या स्वरूपातील कोरोनाचा अकोलेकरांना धोका कमी आहे; मात्र अशा परिस्थितीत बेफिकरी करून चालणार नाही. प्रत्येक व्यक्तीने विशेष सतर्कता बाळगत नियमांंचे पालन करण्याची आवश्यकता आहे.
इंग्लड येथून अकोल्यात आठ जण दाखल झाले असून, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. या सर्वांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर आठवडाभर आरोग्य विभागाचे लक्ष राहणार आहे.
- डॉ. फारूख शेख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा, अकोला.