अकोला : इयत्ता आठवी, दहावीचा सर्व अभ्यासक्रम २०१८ आणि २०१९ या वर्षामध्ये बदलणार असल्याचे राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने विभागीय कार्यालयांना कळविले आहे. तसेच जून महिन्यामध्ये इयत्ता सातवी आणि नवव्या वर्गाची सर्व पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित करणार आहेत.पुण्याच्या राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून दरवर्षी प्राथमिक व माध्यमिक शालेय अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके बदलविण्यात येतात. त्यासाठी संशोधन मंडळातील तज्ज्ञांकडून कोणते बदल करायचे आणि कोणता विषय द्यायचा, यासंदर्भात सूचना मागविण्यात येतात, त्यामुळे पुढील वर्षीपासून इयत्ता आठवी आणि इयत्ता दहावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून विभागीय कार्यालयांना सूचना दिल्या आहेत; तसेच पाठ्यपुस्तके बदलाबाबतची माहिती अधिकृत पुस्तक विक्रेत्यांसह शिक्षण संस्थांना देण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. इयत्ता आठवी आणि दहावीची सर्व पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम संशोधक, लेखकांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे करीत असून, पाठ्यपुस्तके तयार झाल्यानंतर राज्यातील पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या भांडार व वितरण विभागाकडे वितरणासाठी देणार आहेत. अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके बदलणार असल्याने, शिक्षण विभाग स्तरावर शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग येत्या जून महिन्यापासून घेणार आहेत. या वृत्ताला राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयाने दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)
आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून बदलणार!
By admin | Published: March 21, 2017 3:04 AM