अकोला: विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना विषयानुरूप तंत्रस्नेही व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी इयत्ता पाचवी वआठवीतील विद्यार्थ्यांसाठी ‘ईझी अॅप’च्या माध्यमातून आॅनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येत्या नववर्षापासून आठवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. आॅनलाइन व्हिडिओद्वारे तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.शाळेत शिकताना विद्यार्थ्यांना विज्ञान, भाषा, गणित विषयासंबंधी अनेकदा अडचणी येतात. घरी असताना या अडचणी विद्यार्थ्यांना सोडविता येत नाही. पालकांनाही मुलांच्या शैक्षणिक अडचणी सोडविता येत नाहीत. विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन व्हावे, विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रश्नपत्रिका देऊन घरबसल्या परीक्षा देता यावी आणि पालकांनासुद्धा विद्यार्थ्यांचे गुण कळावे, यासाठी पुणे येथील अभिनव प्रा. लि. नामक कंपनीने ‘ईझी अॅप’ विकसित केले आहे. बहुतांश पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. पालकांनी ईझी अॅप मोबाइलमध्ये डाउनलोड करून घेतल्यावर विद्यार्थ्यांना आॅनलाइन मार्गदर्शन, प्रश्नसंच सहज उपलब्ध होतात. या ‘ईझी अॅप’च्या माध्यमातूनच आठवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षकांचे आॅनलाइन मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तज्ज्ञ शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी काही व्हिडिओ उपलब्ध केले आहेत, तसेच दररोज रात्री ८ वाजता शिक्षक आॅनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.
आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आॅनलाइन मार्गदर्शन १ जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी काही व्हिडिओ बनविण्यात आले आहेत. या व्हिडिओंच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना रात्री ८ वाजता आॅनलाइन मार्गदर्शन करतील.-प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी, माध्यमिक.