लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने शनिवारी राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’मध्ये नदीपात्राच्या दोन्ही काठावर नागरिकांची गर्दी उसळल्याने, मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी अकोलेकर एकवटल्याचा प्रत्यय आला.
पालकमंत्री, खासदारांनी उचलली टोपली!
- - मोर्णा नदीच्या स्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मोठय़ा उत्साहात सहभाग घेतल्याचे दिसून आले. सकाळी ८ वाजता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.
- - हातमोजे, तोंडाला मास्क बांधून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल यांसह लोकप्रतिनिधींनी अक्षरश: नदीपात्रात उतरून जलकुंभी व कचर्याने भरलेली टोपली उचलल्याचे पहावयास मिळाले. मोर्णा नदी स्वच्छतेच्या निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी एकवटल्याचे चित्र दिसून आले. मंकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला अकोलेकरांसाठी विकासाचे हे चांगले संकेत मानले जात आहे.
सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग; मोहिमेला बळ! मोर्णा नदीची स्वच्छता लोकसहभागातून करण्याच्या जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला अकोलेकरांनी प्रतिसाद दिला. यामध्ये अखिल भारतीय मराठी परिषदेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकत अली मिर, रेड क्रॉस इंडियन सोसायटीचे प्रभजितसिंग बछेर, सीताबाई कला महाविद्यालयाचे प्रा. प्रसन्नजित गवई व एनएसयूआयचे विद्यार्थी, कच्छी मेमन जमातचे अध्यक्ष जावेद जकारिया, मारवाडी युवा मंचचे राम बाहेती, ‘सीए’ इंस्टिट्यूटचे घनश्याम चांडक, खाद्यपेय विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्यासह अनेक संघटनांचा सक्रिय सहभाग होता.