अकोला: जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवार, ११ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात १०८ सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभांमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात येणार आहे.
मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर २२४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९ फेब्रुवारी रोजी ११६ सरपंच व उपसरपंच पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये १०६ सरपंच व ११६ उपसरपंचांची निवड करण्यात आली. तर आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य निवडून आले नसल्याने, दहा सरपंच पदे रिक्त राहिली. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील २ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८ सरपंच पदांचा समावेश आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १०८ सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक ११ फेब्रुवारी रोजी घेण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभा घेण्यात येणार असून, ग्रामपंचायतींच्या विशेष सभांमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमार्फत सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
सरपंच, उपसरपंच पदांची निवडणूक
होणाऱ्या ग्रामपंचायतींची अशी आहे संख्या!
तालुका ग्रा.पं.
तेल्हारा १७
अकोट १९
मूर्तिजापूर १५
अकोला १८
बाळापूर १४
बार्शिटाकळी १३
पातूर १२
..................................................
एकूण १०८