२०१९ ची निवडणूक भाजपासाठी कठीण; काँग्रेसला आव्हानात्मक - कुमार केतकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:45 PM2018-07-02T13:45:52+5:302018-07-02T13:48:44+5:30
२०१९ ची निवडणूक भाजपासाठी कठीण ठरणार आहे. सोबतच काँग्रेससाठी ती आव्हानात्मक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
अकोला : विकासाचा बागुलबुवा उभा करून मोदींच्या नावावर निवडणूक जिंकलेल्या भाजपाची सर्व धोरणे निराशात्मक आहेत. सध्या देशातील वातावरण अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. अशा स्थितीत भाजपाच्या विरोधात सर्व पक्षीय एकत्र येऊन निवडणूक लढतील, असे प्रयत्न होताना दिसत असले, तरी प्रत्यक्षात काही पक्षच एकत्र येऊन आघाडी स्थापन करतील, असे स्पष्ट करतानाच २०१९ ची निवडणूक भाजपासाठी कठीण ठरणार आहे. सोबतच काँग्रेससाठी ती आव्हानात्मक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले
स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी जागर मंचच्यावतीने आयोजित व्याख्यानाच्या निमित्ताने ते अकोल्यात आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार नाना पटोले उपस्थित होते. केतकर म्हणाले, की २०१९ ची निवडणूक भाजपासाठी सोपी नाही. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची गेल्या चार वर्षांत पूर्तता झालेली नाही. केवळ आश्वासने अन् घोषणा यापलीकडे सरकारचे कोणतेही काम दिसत नाही. विकास हा शब्द जणूकाही याच सरकारच्या काळात जन्माला आला, असा प्रपोगंडा निर्माण केला आहे. जीएसटीची अंमलबजावणी, नोटाबंदी अशा अनेक पातळीवर सरकार अपयशी ठरले असून, शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष आहे, व्यापारी नाराज आहेत. याचा फटका भाजपाला नक्कीच बसेल. लोकसभेत भाजपाच्या जागा या २०० ते १६० पर्यंत खाली येऊ शकतात, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. पूर्ण बहुमतामध्ये भाजपा सरकार येणार नाही; मात्र सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. या पृष्ठभूमीवर काँग्रेसला आतापासूनच आपली ताकद वाढविण्याचे आव्हान आहे. पक्ष संघटना, लोकांचा विश्वास अशा अनेक पातळीवर काम करण्याचे आव्हान राहुल गांधी यांच्या समोर असल्याचे ते म्हणाले.
महाराष्टÑ सरकारही दिल्लीच्या मर्जीवरच!
राज्यात काँग्रेसची सत्ता असताना भाजपाने नेहमीच काँगे्रसचे सरकार हे हायकमांडच्या इशारावर चालते, अशी टीका केली. सध्याचे राज्यातील भाजपा सरकार हेसुद्धा वेगळे काय करीत आहे. मोदी-शहा यांनी हिरवी झेंडी दिल्याशिवाय एकही काम होत नाही. मुळातच हे सरकार स्वायत्त व सार्वभौम असल्याचे दिसत नाही. राज्यातही भाजपाची स्थिती कमकुवत आहे, त्यामुळे लोकसभा-विधानसभा निवडणुका सोबतच होतील, असेही केतकर म्हणाले.
संघच भाजपाचा खरा चेहरा - पटोले
राष्टÑीय स्वयंसेवक संघाने नेहमीच आमचा भाजपाशी काही संबंध नाही, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात संघच भाजपा चालवित आहे. भाजपाचा खरा चेहरा संघच आहे, असा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला. भाजपा सरकार हे घोषणाबाज सरकार असून, येणाऱ्या काळात जनताच भाजपाला धडा शिकवेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.